आपल्या दिवाळीतला एक दिवा त्यांच्यासाठी. आपल्या गोडधोड मधला एक घास त्यांच्यासाठी आणि आपल्या शंभर रुपयांतला एक रुपया त्यांच्यासाठी देता आला तर त्यांचीही दिवाळी उजळून जाईल.
दिवाळी सण उत्साहाचा, आनंदाचा आणि प्रकाशमय पहाटेचा! अंधाराला दूर सारून प्रकाशमान होण्याचा दिवस. दिवाळीची आतुरता अबालवृद्धांपासून सर्वांनाच असते. नवे कपडे, नवनवीन पदार्थ, सर्वांची भेट आणि हो, भाऊबीज, पाडवा हे त्यातलं विशेष. मनामनात आनंद भरणारा हा उत्सव घराघरात साजरा होतो. तसाच तो खर्चिक असल्याने दिवाळी दिवाळं काढते असाही वाक्प्रचार रूढ झाला तो यावरूनच असावा. तरीही प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी साजरी करतो.
अगदी दसरा संपतो न संपतो तोच दिवाळीची चाहूल लागते. मग खरेदी काय करायची याची यादी समोर यायला लागते. कपडे, दागिने, काही वस्तू, सजावटीचे सामान त्यात आकाशकंदील, पणत्या, दिव्यांच्या माळा आल्याच. सुगंधी तेल आणि उटनेही ठरल्याप्रमाणे. या सगळ्या तयारीत उत्साह ओसंडून वाहत असतो.
पण खरंच अशी दिवाळी सगळ्यांच्या वाट्याला येत असेल का? या प्रश्नाकडे कळत नकळत दुर्लक्ष होते. सगळ्यांची दिवाळी झगमगाटाची कुठे असते? काही दारांमागे मिणमिणते दिवे सुद्धा नसतात. मग कुठली दिवाळी?
काहींच्या वाट्याला असतो फूटपाथ...
काहींच्या असतो झोपड्यांचा आधार...!
काहींकडे नसतात चुलीत जाळायला लाकडं...!
असते ती फक्त जगण्या दुखरी किनार...!
अशा अंधाराशी सख्य असणाऱ्या घरात एक दिवा लावता आला तर किती बरं होईल! आपल्या दिवाळीतला एक दिवा त्यांच्यासाठी. आपल्या गोडधोड मधला एक घास त्यांच्यासाठी आणि आपल्या शंभर रुपयांतला एक रुपया त्यांच्यासाठी देता आला तर त्यांचीही दिवाळी उजळून जाईल.
ही दिवाळी तुमच्या मनात उजेड घेऊन येईल असं काहीतरी नक्की करा. गरजुंना शक्य ती मदत करा पण मदत केल्याचे जगजाहीर मांडत बसू नका. नाहीतर मग तो स्वार्थ होईल. मदतीला आणि दानाला कधीच उपकाराचा वास नसावा. नाहीतर त्या वासाचा दुर्गंध व्हायला वेळ लागत नाही. मदत केल्यानंतर तुमच्या मनात समाधानाची चेतना संचारली पाहिजे. चेहऱ्यावर एक लकेर उमटली पाहिजे. यासाठी सजग रहा. चला तर मग या दिवाळीला आपल्याला आनंद मिळेलच पण त्या सोबतीला थोडे समाधानही जोडूया.... माणूस होऊया..!
प्रकाशाचे वाटेकरी,
सारे तुम्ही आम्ही..!
तरीही काही दाराआड,
अंधःकार आहे....!
जगण्याचा हक्क,
इथे प्रत्येकाला..!
तरीही इथल्या उतरंडीने,
पिचला एक एक देह आहे..!
कुठे भरल्या पोटाचा,
कुठे अर्धपोटी,
तर कुठे उपाशी,
इथेच समोर गाव आहे..!
खूप नाही थोडके,
जास्त नको _देऊ मोजके..!
तेवढ्यानेही भरून जाईल,
अशीच रिती ओंजळ आहे...!
प्रा. सागर मच्छिन्द्र डवरी
हरमल- पेडणे