वेळीप आदिवासी समाजात हा धिल्लो आजही वैविध्यपूर्ण रूढी परंपरांचे पालन करून मोठ्या उत्साहात साजरा करतात. गाव, तालुकापरत्वे त्यात वेगळेपण आढळेल. मात्र त्यामागची भावना ही निसर्गाप्रतीचे प्रेमच आहे.
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. नक्की कधी, कोठे ही गोष्ट घडली? कोणाच्या मुखातून ती प्रवाहित झाली? हे सांगता येणार नाही. मात्र जुन्या जाणत्यांच्या मुखातून ऐकिवात आली ती अशी होती...
कुमारवयीन मुली गुरावासरांना घेऊन चरायला जायच्या. सकाळीच घरातून निघायचे. नदी काठाने, डोंगराच्या पायथ्याशी गुरांना चरायला सोडल्यावर इतर काही कामच त्या मुलींना उरत नसे. मग संपूर्ण दिवसभर करायचे तरी काय? हा मोठाच प्रश्न त्यांच्यासमोर असायचा. मग त्यांनी आपणच विविध खेळ खेळण्यास सुरुवात केली. दोघी चौघींनी माती आणली. काहींनी माती कालविण्यासाठी नदीचे पाणी आणले. माती कालवून त्याचा गोळा तयार केला. तेथेच कोठेतरी एखाद्या दगडांवर तो ठेवला असावा. आजूबाजूला कसली कसली फुलं फुललेली. ती तोडली. त्या फुलांनी, पानांनी गोळ्याला सजवले आणि मग त्याला देव मानून त्याच्यासमोर गाऱ्हाणेही घातले असावे. त्याच्या भोवती फेर धरला... आणि मग गायन, नृत्य, पदन्यासाची त्यांना नशा चढत गेली. सकाळपासून तहानभूक विसरून हे नृत्य चालूच राहायचे. बरोबर आणलेली शिदोरी प्रसाद म्हणून भक्षण केली गेली असावी. संध्याकाळी गुरांना गोठ्यात परतावयाची घाई लागायची, तेव्हा मग तो मातीचा गोळा नदीत विसर्जित करून सर्वजणी घरच्या दिशेची वाट गुरांना घेऊन धरायच्या.
एकदा म्हणे खेळता खेळता त्या देहभान विसरल्या. सभोवताल काळोखात बुडाला. गुरे कधीचीच येऊन वाट पहात होती. त्या भानावर आल्या तेव्हा बराच उशीर झाला होता. त्यांना घरचे वेध लागले. घाईघाईने गुरांना घेऊन त्यांनी घरची वाट धरली. त्या गडबडीत पूजेला लावलेल्या मातीच्या गोळ्याला नदीत विसर्जित करायचे राहूनच गेले. त्यातील देव त्या मुलींच्या मागे मागे गावात आला. त्यावेळेपासून म्हणे धिल्लोत्सवाची परंपरा गोव्यातील काणकोण, केपे, सांगे सारख्या तालुक्यातील विविध गावात आदिवासी समाजात दिसते. ही एक लोककथा जाणत्यांच्या मुखातून ऐकली होती. त्यातील वास्तवाचा शोध घेण्यापेक्षा त्यामागची लोकभावना महत्त्वाची ठरते. दसरा ते दिवाळी या काळात हा उत्सव चालू असतो. कुमारी मुलींचा हा उत्सव. अलीकडे त्यात सासुरवाशीणी, माहेरवाशिणी मोठया प्रमाणात सहभागी होतात. हा धारित्रीचा उत्सव, सृजन आणि सर्जकतेचा उत्सव...
तळ्यांनी आकेसां भरयालो देंवा
आज नमन घालू आमी धर्तर माये गा
धर्तरे माये गा आमी येयलीं खेळोक
येयली तुमी बरीं जाली
धिल्ल्या शेज भरांय गो
माणं धरून खेळायं म्हजा धालोरा
तळ्यानी आकेसां भरयालो देंवा
आज नमन घालू आमी आदी माये गा.
आदी माये गा आमी येयली खेळोंक
येयली तुमी बरीं जाली
धील्ल्या शेज भरांय गो
माणं धरून खेळायं म्हजा धालोरा
असे म्हणून सर्वजणी मिळून गीत नृत्याची सुरुवात करतात. कोठे मातीच्या, तर कोठे शेणाच्या गोळ्याची पूजा केली जाते. झेंडूची फुले यासाठी महत्वाची मानली जातात. काही ठिकाणी प्रत्येक दिवशी हा नवीन गोळा केला जातो. जेव्हा शेणाचा गोळा केला जातो, तेव्हा तो आळूची माडी ज्या चरीत म्हणजेच माडीची वाढ चांगली व्हावी म्हणून जो लांबलचक खड्डा खणला जातो, त्याच्यात धिल्लोचे विसर्जन केले जाते. मातीच्या गोळ्याला वाजत गाजत नेत पाण्याच्या प्रवाहात विसर्जन करण्याची परंपरा आहे. वेळीप आदिवासी समाजात हा धिल्लो आजही वैविध्यपूर्ण रूढी परंपरांचे पालन करून मोठ्या उत्साहात साजरा करतात. गाव, तालुकापरत्वे त्यात वेगळेपण आढळेल. मात्र त्यामागची भावना ही निसर्गाप्रतीचे प्रेमच आहे.
मातीविषयीची आंतरिक ओढ अशी सहजासहजी तुटत नसते.
नृत्यगीत गायनासाठी जरी महिला मोठया प्रमाणात सहभागी होत असल्या, तरी धिल्ल्याची पूजा करणे, गाऱ्हाणे घालणे, त्याचे विसर्जन करणे यासाठी मात्र दिंड्या म्हणजेच कुमारी मुलींचा वावर असतो.
आकरी पाकरी
धिल्ल्या तुजी चाकरी
धिल्ले घातले माळा...
धिल्लो मातयेचो
पाताळातून धिल्लो येयला...
ह्या धिल्ल्याक किते साजे
साजे साजे माती साजे...
साजे साजे फुला साजे...
धिल्लोसाठी म्हणण्यात येणाऱ्या गीतांचा उल्लेख अनुभवला तर त्यातील नैसर्गिक अनुभूतीचा उत्स्फूर्त आविष्कार अधोरेखित झालेला दिसतो. वेळीप समाज हा डोंगरदऱ्यांत वावरणारा, खडतर जीवन जगणारा. कष्ट त्याच्या पाचवीलाच पुजलेले. जंगलात वावरताना हिंस्त्र श्वापदांशी त्याला रोजच सामना करावा लागत असे. गुरे-वासरे, निसर्ग ही त्याची जगण्याची साधने. त्यांच्या प्रतिची कृतज्ञता त्यांनी बाळगलेली आहे. धिल्ल्याची सांगता दिवाळीच्या पाडव्याला होते. त्या दिवशी जनावरांना गोडाधोडाचे खायला केले जाते. पाडव्याला ते गोरवां पाडवो असे म्हणतात. त्या दिवशी गुराकडून कोणतेच काम करून न घेता, त्यांना आंघोळ घालून सजविले जाते. त्यांच्या सर्वांगावर रंगीत गोल काढून आकर्षक करतात. गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्याचबरोबरीने खायचे वडे, पोळे यांच्याही माळा करून गळ्यात घातल्या जातात. पूजा करून त्यांना चरायला रानात सोडले जाते. त्यादिवशी त्यांच्यासाठी खास नवी दावी करून ती तुळशीसमोर ठेवली जातात. गोठा स्वच्छ केला जातो. एका बाजूला गीत-नृत्य जल्लोषात सुरू असते, तर दुसऱ्या बाजूने चरायला गेलेल्या जनावरांची ओढ घरच्यांना लागलेली असते. गोठ्याच्या दरवाज्यावर मुसळ ठेवून त्याद्वारे जनावरांना गोठ्यात घेतले जाते. गळ्यात घातलेल्या वड्यांच्या, पोळ्यांच्या माळा दिवसभर गुरामागे रानोमाळ हिंडून मुलांनी काढून खाल्लेल्या असतात. दिवस कधी मावळतो लक्षातच येत नाही. तिन्हीसांजेलाच धिल्लोच्या विसर्जनाची तयारी सुरू होते. दिवसभर उत्साहवर्धक गतीने चाललेले नृत्य, गायन, खेळ आता मंदावलेला असतो. शरीराला थकवा जाणवत असला, तरी मन उत्साहाने, आनंदाने भरलेले असते.
धिल्ल्या देवा गा आमी येयली खेळोक गा
इली ते बरे जाले देवाक फुला रचा गा
चाफी खुंटली भाऊ,आमगेर भरले झोळ्यो
घातले भयणीन आमगेर वावळयो दोन
माळतल्यो भयणी आमचे खोपोभर
पळयतले आवयबापूय तांकां दोळेभर...
हा असा धिल्लोचा उत्साह कार्तिक मासाला वेढून येतो. अश्विन-कार्तिक महिन्यात आकाशात चंमचमणाऱ्या ताऱ्यांची दिवाळी सुरू होते. या इथे गोव्यातील विविध गावात दसरा ते दिवाळी याच कालावधीत कोठे गितीगायन, तर कोठे कातयो उत्सव जो आकाशातील नक्षत्रांना साक्षीभूत ठेवून सुरू असतो. निखळ आनंद देणारे हे उत्सव मातीपासून ते आकाशापर्यंत, निसर्गतत्त्वांना, सृष्टीतील चराचरात असलेल्या चैतन्यदायी सर्जकतेचा जणू महोत्सवच साजरा करतात.
पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)