मुलाखत

“मी कम्प्लेंट मागे घेतो. सोडून द्या त्याला. चल रे, माझ्यासोबत चल. मी काहीतरी करतो तुझ्यासाठी. निदान तुला अशा प्रकारच्या मुलाखतींना तोंड द्यावे लागणार नाही.”

Story: कथा |
56 mins ago
मुलाखत

“सोडू नका साहेब त्याला. स्थानकावरील लोकांना लुटण्याचा धंदाच आहे बहुदा त्याचा." खराडे बोलत होते.

“नाही हो. मला पैशांची गरज होती, त्यामुळे. मी अडाणी नाही. मी शिकलेला आहे. पण त्या डिग्रीचा काय उपयोग? डिग्रीने पोट भरत नसतं साहेब..." तो खराडेंना समजावण्याचा प्रयत्न करत होता.

“ट्रेन सुटायला बराच अवधी बाकी होता. म्हणून तू टीसी नसताना माझ्याजवळ येऊन तिकीट विचारू लागलास. मुलाकडे आहे, तो खाली उतरून गेलाय, मग देतो म्हणून सांगत होतो की नाही मी?” खराडे रागाने बोलत चालले होते.

“हे काय आहे सारं. तरीही तुझी चूक नाही असं वाटतं तुला?” किमती साहित्य त्याच्याजवळ मिळालेलं पाहून पोलीस विचारात होते.

“काय रे. असा गैरवापर करून पैसे उकळतोस प्रवाशांकडून? आजपर्यंत किती जणांना असं लुटलंस तू? आम्ही पकडलं म्हणून, नाहीतर असंच...” पोलीस ठणकावत म्हणाले.

“साहेब, माझं ऐकून तर घ्या. हे सारं मी नाइलाजाने करत होतो. माझ्यासमोर दुसरा मार्ग नव्हता. मला दोन लाखांची गरज आहे. ती रक्कम जमा होईपर्यंत असं करणार होतो. मला सोडून द्या साहेब. माझ्या आई-वडिलांना काय वाटेल हे कळलं तर? त्यांच्यासाठीच तर मी हे सारं करत होतो.” त्याच्या डोळ्यात सच्चाई दिसत होती. पश्चात्तापाने तो पुरता कोलमडल्यागत झाला होता.

“काय बोलतोयस तू? आई-वडिलांनी पाठवलं तुला हे असं करायला? महान आहेत ते सुद्धा!” पोलिसांचा आवाज चढला होता.

“साहेब, माझ्या आई-वडिलांना दोष नका देऊ. त्यांना यातलं काहीच माहीत नाही.” तो कळवळून उद्गारला.

“बरं. सांग तुला तुझ्या सफाईत काय सांगायचं आहे ते. पण याचा अर्थ पोलीस तुला सोडून देणार असा होत नाही.” खराडे पुढे येत म्हणाले.

त्यांच्या बोलण्याने त्याचे डोळे चमकले. तो सावरून बसला. तो प्रसंग कालच घडल्यासारखा त्याला आठवत चालला होता. त्यानुसार तो बोलत होता.

“संपत रावराणे" मुलाखतीसाठी आपलं नाव पुकारलेलं ऐकून तो उठला.

“मे आय कम इन सर?” केबिनचे दार उघडून त्याने आत वाकत विचारले.

“येस! या...” असं आतील पॅनलने म्हणताच तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला.

“प्लिज सीट डाऊन मिस्टर रावराणे.” समोरच्या पॅनलपैकी एक जण म्हणाला. एकजण त्याची सर्टिफिकेट्सची फाइल चाळत बसला होता. उरलेले दोघे त्याला प्रश्न विचारीत चालले होते.

“यावर्षीच पोस्ट ग्रॅज्युएट झालो सर. एम. कॉम. आहे मी.” त्यांच्या प्रश्नावर उत्तर देत संपत म्हणाला.

“नोकरीचा एक्सपिरियन्स आहे का काही?”

“नाही सर. धिस इयर एम. कॉम. पूर्ण केलेय मी...” संपत पुन्हा एकदा म्हणाला.

आवडी-निवडी, फॅमिली बॅकग्राऊंड? नोकरीची गरज कितपत आहे? या साऱ्या विषयावर पॅनलतर्फे त्याला अनेक प्रश्न विचारले गेले. त्यानेही तशीच समर्पक उत्तरं दिल्याचं पॅनलच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं.

“मला वाटतं तुम्ही या जागेसाठी योग्य आहात. पण आमच्या संस्थेसाठी डोनेशन म्हणून काहीतरी द्यावं लागेल.” मुलाखत घेणाऱ्या पॅनलपैकी एकजण गालात हसत बोलला.

“त्यांच्या या वाक्यानं मी गोंधळून गेलो. दरवेळी हे असंच चालू होतं. आजपर्यंत मी भरपूर इंटरव्ह्यू दिले. प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती कोणत्या ना कोणत्या प्रकारे समोर आली. कुठे स्पष्टपणे पैशाची मागणी केली जायची, तर कधी आडून, बाजूला बोलावून. बऱ्याच कॅन्डिडेट्सना ही गोष्ट माहीत झाली होती. ज्यांच्याकडे पैसे आहेत तो लाख-लाखभर रुपये पिशवीत घेऊन इंटरव्ह्यूला यायचा नि नोकरी मिळाल्याच्या आनंदात हसत बाहेर पडायचा. आमच्यासारख्या गरिबाने काय करायचं? कुठून आणायचे पैसे यांना डोनेशन वगैरे द्यायला?" संपत सांगत होता.

“मग काय केलंस तू त्यावेळी? सरळ नाही म्हणायचं द्यायला असं करण्यापेक्षा!" खराडे उद्गारले.

“काही ठिकाणी ओळखीचा, पॉवरचा वापर करून बरेच जण नोकरी मिळवतात. विदाऊट डोनेशन! तशी ओळख देखील नाही आपली नोकरी मिळवायची तर. हल्ली बऱ्याच ठिकाणी नावापुरते इंटरव्ह्यू घेतले जातात आणि त्यात गरीब गरिबीमुळे भरडले जातात. सर्टिफिकेट्सवर चांगले मार्क असूनही हुशार विद्यार्थी मुलाखतीच्या सध्याच्या अशा फार्समुळे मागे राहायला लागले आहेत. तर सामान्य बुद्धीची काही माणसं पैशाच्या जोरावर बाजी मारून जात आहेत.” त्याने एक क्षण थांबत सभोवार पाहिलं. सारे जण त्याचं बोलणं ऐकत स्तब्ध उभे होते. तो पुन्हा बोलू लागला.

“आई-वडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी मला ही नोकरी मिळवणं गरजेचं होतं. घरात पाच बहिणी आहेत लग्नाच्या. त्यांचंही कर्तव्य मलाच पार पाडायचंय. नोकरीच नसली तर कसं होईल माझ्या घरातल्या माणसांचं? म्हणून डोनेशनचे पैसे साठवण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं." संपत बोलत चालला होता. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं.

"परिस्थिती माणसांकडून काय काय करवीत असते नि त्यात भर म्हणजे ही अशी मुलाखतीच्या नावाखाली डोनेशन मागणारी, पैसे उकळणारी काही माणसं. भल्याभल्यांना बरेच रस्ते दाखवतात. अशा अनेक प्रकारांतून चुकीच्या मार्गाकडे वळण्याची प्रवृत्ती वाढीस लागलीय. जबाबदारी नसलेला एखादा स्वाभिमानी अशी नोकरी नसली तरी चालेल म्हणून आरामात घरात बसेल. पण यांच्यासारख्या गरिबांचं काय? त्यानं कोणाच्या तोंडाकडे बघायचं? जबाबदारीचं ओझं पाठीवर असताना..." सारा प्रकार ऐकून खराडेंचा संयम सुटला होता. ते बोलत चालले होते.

"तरीही याला पकडावं लागेल मला, झाल्या प्रकारासाठी...' पोलीस नाइलाजाने म्हणाले.

“मी कम्प्लेंट मागे घेतो. सोडून द्या त्याला. चल रे, माझ्यासोबत चल. मी काहीतरी करतो तुझ्यासाठी. निदान तुला अशा प्रकारच्या मुलाखतींना तोंड द्यावे लागणार नाही. समाजात चांगलीही माणसं आहेत जी मुलाखतीच्या नावाखाली पैसे उकळत नाहीत. तर कॅन्डिडेटच्या क्वालिफिकेशनवर, त्यांच्या हुशारीवर नोकरी देतात. पण बोटावर मोजण्याइतकी!” असं म्हणत ते त्याच्यासोबत बाहेर पडले.


गौरी भालचंद्र