महिला विश्वचषक २०२५ : ऋचा घोषची पराक्रमी खेळी व्यर्थ
विशाखापट्टणम : येथे खेळल्या गेलेल्या आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ च्या दहाव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर तीन विकेट्सने विजय मिळवला. हा सामना आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वात रोमांचक लढतींपैकी एक ठरला. टीम इंडिया जिंकण्याच्या उंबरठ्यावर असताना नडीन डिक्लर्क हिने दक्षिण आफ्रिकेसाठी अद्भुत खेळी करत सामना पलटवला. तिच्या नाबाद ८४ धावांच्या (54 चेंडू) तुफानी खेळीमुळे आफ्रिकन संघाने ४८.५ षटकांत २५२ धावांचे आव्हान पार केले.
या पराभवामुळे भारताला या विश्वचषकातील पहिली हार पत्करावी लागली. तसेच, वर्ल्ड कपच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा हा सलग तिसरा पराभव आहे. ---
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सुरुवात चांगली केली होती. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी अर्धशतकी भागिदारी केली. मात्र त्यानंतर भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
मंधाना पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरली, तर मागील दोन सामन्यांत चांगली कामगिरी करणारी हरलीन देओलही या वेळी फार काळ टिकू शकली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचाही अपयशाचा क्रम सुरूच राहिला.
एक वेळ भारतीय संघाची स्थिती १ बाद ८३ वरून ६ बाद १०२ अशी झाली. या कठीण परिस्थितीत मैदानात आली ऋचा घोष. सुरुवातीला तिने अमनजोत कौरसह संयमाने फलंदाजी केली आणि अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर स्नेह राणासोबत तिने भारतीय डावाला नवसंजीवनी दिली. दोघींनी मिळून केवळ ५३ चेंडूत ८८ धावा फटकावल्या.
स्नेह राणाने २४ चेंडूत ३३ धावा केल्या, तर ऋचाने ७७ चेंडूत तुफानी ९४ धावा ठोकल्या. तिच्या खेळीमध्ये चौकार आणि षटकारांचा वर्षाव झाला. दुर्दैवाने ती शेवटच्या षटकात बाद झाली आणि तिचा पहिले शतक फक्त सहा धावांनी हुकले. दक्षिण आफ्रिकेच्या क्लोए ट्रायॉनने उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन महत्त्वाचे बळी घेतले.
२५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फारच खराब झाली. केवळ तिसऱ्या षटकात प्रतिका रावलने स्वतःच्या गोलंदाजीवर एक हाताने झेल घेत टेजमिन ब्रिट्सला (शून्यावर) बाद केले. मागील सामन्यात शतक झळकावलेली ब्रिट्स या वेळी खातेही उघडू शकली नाही. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोसळले आणि एकावेळी आफ्रिकन संघाचा स्कोर ८१ धावांवर पाच बाद असा झाला. भारताला विजय निश्चित वाटत असतानाच कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट आणि ट्रायॉन यांनी डाव सावरण्याची जबाबदारी घेतली. दोघींनी मिळून ७१ धावांची भागीदारी केली. मात्र, भारतासाठी क्रांतीने पुन्हा आशा निर्माण केली. ती गोलंदाजीसाठी परतल्यावर तिने वोल्वार्ड्टला क्लीन बोल्ड करत ही जोडी फोडली. पण त्यानंतर आलेली नडीन डिक्लर्क भारतीय गोलंदाजांवर तुटून पडली.
नडीन डिक्लर्कची विजयी खेळी
डिक्लर्कने मैदानात येताच आक्रमक फलंदाजी करत ट्रायॉनसह ६९ धावांची भागीदारी केली. ४७ व्या षटकात तिने क्रांतीवर सलग दोन षटकार आणि चौकार ठोकत फक्त ४१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तिच्या खेळीमुळे सामना पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकला. तिने शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला ४८.५ षटकांत विजय मिळवून दिला. तिची ८४ धावांची खेळी (५४ चेंडू, ९ चौकार, ४ षटकार) निर्णायक ठरली.
ऋचा घोषचा पराक्रम
या सामन्यातील पहिल्या डावातील शेवटच्या षटकात ऋचा घोष शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती. या षटकात तिने लागोपाठ चौकार मारले. षटकातील चौथ्या चेंडूवर तिने षटकार मारण्याच्या प्रयत्न केला. मात्र षटकार मारण्याच्या प्रयत्नात ती बाद होऊन माघारी परतली. दरम्यान ती वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघाकडून सर्वात मोठी खेळी करणारी यष्टिरक्षक फलंदाज ठरली आहे. या विक्रमात तिने फौजीह खलील यांना मागे टाकले आहे. फौजीह यांनी १९८२ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना ८८ धावांची खेळी होती. तर अंजू यांनी १९९३ मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध खेळताना ८४ धावांची खेळी केली होती. या यादीत ती आता अव्वल स्थानी पोहोचली आहे.
मेग लॅनिंग आणि एलिसा हिलीला टाकले मागे –
ऋचा घोषने महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये १००० धावा पूर्ण करणारी तिसरी सर्वात वेगवान फलंदाज म्हणून आपले नाव नोंदवले. तिने १०१० चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला आणि यासह ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग आणि एलिसा हिली यांना मागे टाकले. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये १००० धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले गार्डनरच्या नावावर आहे, जिने ९१७ चेंडूंमध्ये हा पराक्रम केला होता.
भारताची दुसरी यष्टीरक्षक-फलंदाज ठरली
ऋचा घोष ही भारतीय महिला वनडे क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करणारी दुसरी यष्टीरक्षक-फलंदाज ठरली आहे. तिच्यापूर्वी हा पराक्रम भारताच्या माजी खेळाडू अंजू जैन यांनी केला होता. याशिवाय, ऋचा आणि स्नेह राणा यांच्यातील आठव्या विकेटसाठी झालेली ८८ धावांची भागीदारी ही महिला वनडे क्रिकेट इतिहासातील आठव्या किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठी संयुक्तपणे तिसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.
५वी विकेट पडल्यावर सर्वाधिक धावा करणारे संघ
१७१ धावा : दक्षिण आफ्रिका महिला संघ विरुद्ध भारत महिला संघ, विशाखापट्टणम, २०२५
१५९ धावा : इंग्लंड महिला संघ विरुद्ध भारत महिला संघ, वानखेडे, २०१९
१५१ धावा : इंग्लंड महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ, वेलिंग्टन, २०२४
१४६ धावा : बांगलादेश महिला संघ विरुद्ध आयर्लंड महिला संघ, लाहोर, २०२५
विश्वचषकांतील सर्वांत माेठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग
२७८ धावा : ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला, ऑकलंड, २०२२
२७५धावा : दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारत महिला, क्राइस्टचर्च, २०२२
२७२ धावा : ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला, वेलिंग्टन, २०२२
२५८ धावा : ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध श्रीलंका महिला, ब्रिस्टल, २०१७
२५२ धावा : दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारत महिला, विशाखापट्टणम, २०२५
क्रमांक ८ किंवा त्या खालील फलंदाजाच्या सर्वाधिक धावा
९४ धावा : ऋचा घोष विरुद्ध द. आफ्रिका, विशाखापट्टणम, २०२५
८४ धावा : नडीन डी क्लर्क विरुद्ध भारत, विशाखापट्टणम, २०२५
७४ धावा : क्लोए ट्रायॉन विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, २०२५
६९ धावा : फातिमा सना विरुद्ध द. आफ्रिका, कराची, २०२५