रेस्ट ऑफ इंडियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा
नागपूर : नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर इराणी करंडक २०२५ चा अंतिम सामना रविवारी रणजी विजेता विदर्भ आणि रेस्ड ऑफ इंडिया यांच्यात पार पडला. या सामन्यात अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखालील विदर्भाने रेस्ट ऑफ इंडिया संघाला ९३ धावांनी पराभूत करत तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठित करंडक जिंकला. यापूर्वी विदर्भाने २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्येही हा करंडक आपल्या नावावर केला होता.पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर विदर्भाने दुसऱ्या डावातही संयमी फलंदाजी केली. संघाने २३२ धावा जोडल्या आणि रेस्ट ऑफ इंडियासमोर ३६१ धावांचे आव्हान ठेवले. रेस्ट ऑफ इंडियाने शेवटच्या डावात चिवट झुंज दिली, पण त्यांचा डाव २६७ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या डावात हर्ष दुबे याने ४ बळी घेतले, तर यश ठाकूर आणि आदित्य ठाकरे यांनी प्रत्येकी २ बळी घेत रेस्ट ऑफ इंडियाच्या आशा पूर्णपणे धुळीस मिळवल्या.
या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि त्यांची सुरुवात भक्कम झाली. सलामीवीर अथर्व तायडेने शानदार शतक झळकावत १४३ धावांची खेळी साकारली, ज्यामध्ये १५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. त्याला यश राठोडने ९१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत उत्तम साथ दिली. या दोघांमधील भक्कम भागीदारीमुळे विदर्भाने पहिल्या डावात ३४२ धावांचा डोंगर उभा केला. रेस्ट ऑफ इंडियाकडून आकाश दीप आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
रेस्ट ऑफ इंडिया फलंदाजीसाठी उतरला असता विदर्भाच्या गोलंदाजांनी त्यांना संधीच दिली नाही. रेस्ट ऑफ इंडियाचा डाव अवघ्या २१४ धावांवर आटोपला. कर्णधार रजत पाटीदारने ६६ धावा आणि अभिमन्यू ईश्वरनने ५२ धावा केल्या. मात्र, यश ठाकूरने ४ बळी घेत भेदक गोलंदाजी केली, तर हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी २ बळी घेत विदर्भाला मजबूत स्थितीत आणले.
या विजयासह विदर्भाने इराणी करंडकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा आपले नाव कोरले. अथर्व तायडेचे शतक आणि यश ठाकूरची घातक गोलंदाजी यामुळे विदर्भाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. नागपूरच्या खेळपट्टीवर विदर्भाच्या या दमदार कामगिरीने देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांचे वाढते वर्चस्व अधोरेखित झाले आहे.
यश धूल, यश ठाकूर भिडले
सामन्याच्या शेवटच्या दिवशी मैदानात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यश धुल आणि यश ठाकूर या दोन खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. जर पंच आणि खेळाडूंनी यात हस्तक्षेप केला नसता, तर दोन्ही खेळाडूंमध्ये हाणामारी झाली असती. रेस्ट ऑफ इंडियाच्या दुसऱ्या डावात ६३ व्या षटकामध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ६३ व्या ओव्हरमध्ये विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूरने पहिला चेंडू थोडा शॉर्ट टाकला. त्यावर यश धुलने अप्पर कट मारण्याचा प्रयत्न केला. पण फटका योग्य वेळी मारण्यात तो अयशस्वी ठरला. अथर्व तायडेने सोपा झेल घेत यश धुलला बाद केले. विकेट मिळाल्यानंतर यश ठाकूरने आक्रमकपणे आनंद साजरा केला. ९२ धावा काढणारा यश धुल आधीपासूनच आक्रमक मूडमध्ये होता. त्याने यश ठाकूरच्या सेलिब्रेशनवर नाराजी व्यक्त केली. दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि वातावरण तापले. यादरम्यान पंचानी मध्यस्थी करत हस्तक्षेप केला. त्यांनी दोन्ही खेळाडूंना वेगळे केले. विदर्भाच्या खेळाडूंनीही मध्यस्थी केली. त्यानंतर परिस्थिती शांत झाली.