शिक्षण क्षेत्रात खळबळ : एका कर्तृत्ववान, शिस्तप्रिय शिक्षकाच्या जाण्याने हळहळ
सिंधदुर्ग : शिक्षकांसाठी सक्तीची केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपयश आल्यास नोकरीवर गदा येईल, या नैराश्येतून गावठणवाडी-आंबोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम (३६) यांनी आत्महत्या केली. गेळे-कदमवाडी येथील राहत्या घरी त्यांनी आपले जीवन संपविले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून एका कर्तृत्ववान, शिस्तप्रिय शिक्षकाचा बळी ‘टीईटी’च्या भीतीने घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.
चिठ्ठीतून उघड झाले कारण
आनंद कदम हे गावठणवाडी-आंबोली येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांची ओळख एक शिस्तप्रिय आणि शिक्षणप्रेमी शिक्षक म्हणून होती. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होते. शुक्रवारी दुपारी तब्येतीचे कारण सांगून ते शाळेतून घरी गेले आणि रात्रीच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घराच्या एका खोलीत गळफास लावून जीवन संपवले. त्यांच्या भावाने खिडकीतून त्यांना मृतावस्थेत पाहिल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, त्यांना एक सुसाईड नोट (चिठ्ठी) सापडली. या चिठ्ठीत कदम यांनी ‘मी टीईटी परीक्षा पास होऊ शकत नाही’ असा स्पष्ट उल्लेख करून आत्महत्येचे कारण नमूद केले आहे.
‘टीईटी’ सक्तीची टांगती तलवार आणि शिक्षकांची चिंता
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात २० ऑगस्ट २०१३ नंतर नियुक्त झालेल्या (आणि काही विशिष्ट अटींव्यतिरिक्त) सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्याची सक्ती केली आहे. टीईटी उत्तीर्ण न झाल्यास नोकरी गमवावी लागेल किंवा पदोन्नती मिळणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे देशभरातील कार्यरत शिक्षकांमध्ये मोठा तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आनंद कदम यांच्यासारख्या प्रामाणिक आणि सेवावृत्तीच्या शिक्षकांनाही याच ‘टीईटी’च्या अपयशाच्या भीतीने ग्रासले होते, ज्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
पत्नी, सहा वर्षांचा मुलगा पोरका
आनंद कदम यांचे आई-वडील पुणे येथे होते, तर त्यांची पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा गडहिंग्लज येथे राहत होते. त्यांच्या अकाली निधनाने आंबोली आणि गेळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे.