२३ दिवसांनंतर रामाच्या तोंडातून मुख्यमंंत्र्यांचे, माझे नाव कसे ? : रोहन खंवटे

नावे वदवून घेण्याच्या प्रकाराची कसून चौकशी करण्याची मागणी


19 hours ago
२३ दिवसांनंतर रामाच्या तोंडातून मुख्यमंंत्र्यांचे, माझे नाव कसे ? : रोहन खंवटे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : हल्ल्याच्या २३ दिवसांनंंतर रामा काणकोणकरच्या तोंडातून मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि माझे नाव कसे आले ? रामाने पोलिसांना दिलेल्या जबाबात कोणाचेच नाव घेतले नव्हते. डिस्चार्ज दिल्यानंंतर त्याने मुख्यमंंत्र्यांंचे आणि माझे नाव कसे घेतले ? त्याच्या तोंडात नावे घालण्याच्या प्रकाराची कसून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी पर्यटनमंंत्री रोहन खंवटे यांनी केली.
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर १८ सप्टेंबर रोजी करंंझाळे-पणजी येथे जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यानंंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून संंशयितांना अटक केली होती. रामा काणकोणकर यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना पोलिसांना जबाब दिला होता. त्यावेळी त्याने मुख्यमंंत्री आणि माझे नाव घेतले नव्हते. डिस्चार्ज मिळाल्यानंंतरच त्याने मुख्यमंंत्री आणि माझे नाव कसे घेतले, असा प्रश्न पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केला आहे. हॉस्पिटलमध्ये असताना त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन अनेकांनी त्याच्या प्रकृतीची चौकशी केली होती. मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत हेसुद्धा त्याला भेटण्यास गेले होते. त्यावेळी त्याने मुख्यमंंत्र्यांना तोंडावरच का सांंगितले नाही ? २३ दिवसांनंंतर नाव कसे आले, असा प्रश्न मंत्री रोहन खंंवटे यांनी उपस्थित केला आहे.


रामाने स्टंटबाजी करू नये : तवडकर 

रामा काणकोणकर यांनी स्टंटबाजी करू नये. ते इतक्या दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांवर आरोप करत आहेत. रामाचा बोलविता धनी कोणी तरी वेगळाच असू शकतो. मुख्यमंत्री अशा प्रवृत्तीचे मुळीच नाहीत, अशी प्रतिक्रिया कला आणि संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी व्यक्त केली.


संशयावरून नाव नको : श्रीपाद नाईक

रामा काणकोणकर यांच्यावरील हल्लाप्रकरणातील आरोपींसह मुख्य संशयितांना पकडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच निर्देश दिले. त्यामुळे ठोस पुरावे नसताना केवळ संशयावरून कोणाचेही नाव घेणे चुकीचेच आहे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. 


रामा काणकोणकरचे आरोप तथ्यहीन : खासदार तानावडे
रामा काणकोणकर यांनी मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत यांंच्यासह पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यावर जे आरोप केले आहेत, ते तथ्यहीन आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांमागील बोलविता धनी कोण आहे, असा प्रश्न खासदार सदानंंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजप कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो आणि जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते.
रामा काणकोणकर वारंवार जबाब बदलत आहेत. त्यांंच्या पत्नीने काही दिवसांंपूर्वी वेगळेच आरोप केले होते. त्यांनी आता मुख्यमंंत्री डॉ. सावंत आणि मंत्री रोहन खंवटे यांंची नावे का घेतली, त्याची चौकशी व्हायला हवी. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, असेही खासदार सदानंंद शेट तानावडे यांनी सांगितले.