पणजी: गोव्यातील सहकारी संस्था आणि बँकांचे आर्थिक व्यवहार लक्षणीयरीत्या वाढत आहेत. गेल्या एका वर्षात राज्यातील सहकारी संस्थांच्या आर्थिक ऊलाढालीत तब्बल ३,६१२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सोमवारी पर्वरी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आकडेवारी:
* २०२२-२३ या वर्षात सहकारी संस्थांची एकूण आर्थिक ऊलाढाल ₹९,९२३ कोटी होती.
* २०२३-२४ या वर्षात ही ऊलाढाल ₹१३,५३५ कोटींवर पोहोचली आहे.
२०२४-२५ या वर्षातील बँकांचे ऑडिटिंग सुरू असून, नोव्हेंबरपर्यंत नवीन आकडेवारी उपलब्ध होईल, असे शिरोडकर यांनी सांगितले.
सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सोमवारी पर्वरी मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय सहकार सप्ताहाची घोषणा केली. गोव्यात १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात या दरम्यान दररोज विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, यंदाचा सहकार सप्ताह 'सहकाराच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेवर आधारित असणार आहे.
अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ऐतिहासिक करार
सहकार क्षेत्रात तज्ज्ञ आणि कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सहकार सप्ताहादरम्यानच गांधीनगर येथील त्रिभुवन विद्यापीठाशी सामंजस्य करार केला जाणार आहे. हे विद्यापीठ सहकार क्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी अग्रगण्य मानले जाते. या करारानुसार, सहकार क्षेत्रातील प्रमाणपत्र, पदविका व पदवी अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे राज्यात राबविले जाणार आहेत.
याशिवाय, सरकारने ग्रामीण भागात युवकांचे गट किंवा फार्मर्स क्लब स्थापन करून सहकार क्षेत्रामार्फत शेती वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या प्रयत्नातून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून २ हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.