ट्रॉजन डिमेलो यांची याचिका निकाली
पणजी: गोव्यातील अत्यंत महत्त्वाचे असलेले लोकायुक्त पद गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त असल्याने भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांची कार्यवाही ठप्प झाली होती. मात्र, आता गोवा सरकारने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात निवेदन देत, पुढील सहा आठवड्यांच्या आत नव्या लोकायुक्तांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती दिली आहे. ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी एका याचिकेवरील सुनावणीवेळी हे निवेदन उच्च न्यायालयात केले.
माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२४ मध्ये संपल्यापासून राज्याचे लोकायुक्त पद रिक्त आहे. लोकायुक्तपद रिक्त असल्याने कायद्याची कार्यवाही ठप्प झाली असून, अनेक तक्रारी आणि याचिका प्रलंबित आहेत. लवकरात लवकर लोकायुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी करणारी याचिका ट्रॉजन डिमेलो यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अभिजीत गोसावी यांनी युक्तिवाद केला होता. ॲडव्होकेट जनरल यांच्या निवेदनाची उच्च न्यायालयाने दखल घेतली आणि त्यानंतर ट्रॉजन डिमेलो यांची ही याचिका निकाली काढली.