मडगाव: चांदर येथील मेगा गृह प्रकल्पावरून ग्रामसभेत ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला घेरले. स्थानिकांनी मोठ्या गृहप्रकल्पांना विरोध दर्शवला असतानाही बांधकाम सुरू असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. प्रकल्पाचे सर्व आवश्यक परवाने व कागदपत्रे सादर न केल्यामुळे काम थांबवण्याची नोटीस जारी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानुसार, १५ ऑक्टोबर रोजी प्रकल्पाच्या जागेवर जाऊन संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
ओळख नष्ट होण्याची स्थानिकांना चिंता
चांदर-कावरे ग्रामसभेत गावात येत असलेल्या मेगा प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. हा गृहप्रकल्प २१ हजार चौरस मीटर जागेवर येत आहे. ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली की, सुमारे ३ कोटी रुपये खर्चून स्थानिक लोक या ठिकाणी घरे घेणार नाहीत. त्यामुळे गावात परराज्यातील लोकांची वस्ती निर्माण होणार असून, यामुळे पाणी, वीज, सांडपाणी आणि कचरा यांसारखे मूलभूत प्रश्न निर्माण होतील.
ग्रामस्थांनी सांगितले की, चांदर गावाने मेगा प्रकल्पांविरोधात सर्वात आधी आक्षेप घेतला होता, पण तरीही मोठे प्रकल्प थांबलेले नाहीत. ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्षेपांवरून पंचायतीने माघार का घेतली, असा सवाल त्यांनी केला. "गावातील जमीन नाही, तर गोमंतकीयांची ओळख आणि संस्कृतीची विक्री होत आहे," अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
मोठ्या गृहप्रकल्पांमुळे गावाबाहेरील लोकांची संख्या इतकी वाढेल की, निवडणुका जिंकण्यासाठी स्थानिकांना त्यांच्या मतांची गरज भासेल आणि त्यामुळे राजकारणी फक्त त्यांचीच बाजू ऐकून घेतील. परप्रांतीयांची संख्या वाढल्यानंतर स्थानिकांचे म्हणणे कोणीही ऐकून घेणार नाही, त्यामुळे गावातील जमिनींची विक्री थांबवण्याची गरज आहे, असे ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले.
पंचायतीला नोटीस देण्याची मागणी
यापूर्वी आक्षेप घेऊन ठराव संमत करण्यात आला होता आणि पंचायतीकडून समिती स्थापन करून कारवाई केली जाणार होती. मात्र, समितीने कोणतीही कारवाई केली नाही किंवा आमदारांचीही भेट घेतली नाही, याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी मागणी केली की, वीज खाते, सांडपाणी विभाग आणि इतर आवश्यक परवानग्या घेतल्या असल्यास त्या कागदपत्रांचे प्रदर्शन करावे. बांधकामांसंदर्भात आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास, मेगा प्रकल्पाचे बांधकाम थांबवण्याचे आदेश (Stop Work Notice) तात्काळ जारी करण्यात यावेत. या मागणीनुसार, पंचायत मंडळाने १५ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रकल्पाच्या जागेची प्रत्यक्ष संयुक्त पाहणी करण्याचे निश्चित केले आहे.