भाजप सरकारच्या योजनेवर टीका; म्हणाले-'माझे घर' भाजपचा मोठा इव्हेंट
पणजी: "गोव्यातील आपले घर वाचवण्यासाठी आणि ते कायम ठेवण्यासाठी इथली जमीन गोमंतकीयांच्या ताब्यात राहणे आवश्यक आहे," असे मत रिव्होल्युशनरी गोवन्सचे (RG) प्रमुख मनोज परब यांनी व्यक्त केले आहे. दिल्लीतील लोकांनी गोव्यात येऊन मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेतल्या आणि शेतजमिनींचे रूपांतरण केले, तर कोणालाही 'माझे घर' बांधणे शक्य होणार नाही, असे परब म्हणाले.
'माझे घर' भाजपचा मोठा इव्हेंट
पाळे-शिरदोण येथे मेगा प्रकल्प आणि जमीन रूपांतरणाविरोधात आरजीने आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. पाळे येथील सातेरी देवळाच्या आवारात झालेल्या या सभेला आरजीचे आमदार विरेश बोरकर यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. ग्रामस्थांनी 'आमचो गाव आमका जाय', 'डोंगर राखूया', 'गाव सांभाळया' (गाव वाचवूया), 'वी वॉन्ट ग्रीन गोवा' (आम्हाला हरित गोवा हवा) असे फलक घेऊन निषेध केला. मनोज परब यांनी भाजप सरकारच्या 'माझे घर' योजनेवर टीका केली. ते म्हणाले की, सध्या परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी होत आहे, डोंगर कापले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जमिनीचे रूपांतरण सुरू आहे.
परब यांनी आरोप केला की, हे जमीन रूपांतरण '५ हजार कोटींचा घोटाळा' आहे. शिरदोण-पाळे येथेच मेगा प्रकल्पांसाठी जमिनीचे रूपांतरण केले जात आहे. जमिनीचे दर गगनाला भिडल्यामुळे गोमंतकीयांना घर बांधणे सध्या अशक्य झाले आहे. या स्थितीत 'माझे घर' योजना हा भाजप सरकारचा एक इव्हेंट आहे असे ते म्हणाले. सरकारने जाहीर केल्यानुसार उद्या सोमवारपासून या योजनेचे अर्ज वाटप सुरू होत आहे.