पणजी: पर्वरी येथील सहा पदरी उड्डाणपुलाच्या चाचणीसाठी सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील काही भागांतील वाहतूक सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी यासंबंधीची सूचना प्रसिद्ध केली. पीडब्ल्यूडीने या 'ट्रायल रन'साठी महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बंद असलेले प्रमुख मार्ग
या चाचणीदरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील खालील भागांतील वाहतूक सर्वसामान्य वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहील:
* ओ कोकेरियो ते शिवाजी चौक पर्यंतचा डाव्या बाजूचा मुख्य मार्ग.
* दामियान-द-गोवा ते आराडी जंक्शन, सुकूर पर्यंतचा उजव्या बाजूचा मार्ग.
या कालावधीत रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने यांसारख्या आपत्कालीन सेवांना मात्र परवानगी असेल.
जड आणि हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
* जड वाहने :
जीवनावश्यक वस्तू आणि इंधन वाहनांव्यतिरिक्त इतर जड वाहने, तसेच आलिशान प्रवासी बसेस यांना पणजीकडे येण्यासाठी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल:
करासवाडा मार्गे → थिवी → असनोडा मार्गे डिचोली व तिथून साखळी→माशेल→जुने गोवे→पणजी हा मार्ग घेण्याचे सुचवले आहे.
* हलकी वाहने
हलकी वाहने आराडी जंक्शनमार्गे डिफेन्स-कॉलनी, कदंबा डेपो आणि बी.बी. बोरकर रोडमार्गे सेवा रस्त्याने शिवाजी चौकात प्रवेश करू शकतील. याशिवाय, सुकूर ते सांगोल्डा जंक्शनमार्गे सुकूर चर्च जंक्शन हा मार्ग या वेळेत एकमार्गी केला जाईल. म्हापसाकडे जाणारी वाहतूक ओ कोकेरे जंक्शनमार्गे चोगम रोड, सांगोल्डा–गिरी या मार्गाने वळविण्यात येणार आहे.
या नियोजित कामासाठी ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रक (ट्रॅफिक मार्शल्स), दिशादर्शक फलक आणि 'नो पार्किंग' बोर्ड लावण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांना आवश्यक प्रवेश सुविधा देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.