मडगाव: नावेली येथे चर्चमधील प्रार्थना आटोपून घरी परतणाऱ्या एका वृध्द महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत सुमारे १.२० लाख रुपये किमतीची सोन्याची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली. याप्रकरणी मडगाव पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
चर्चमध्ये दर रविवारी प्रार्थना असते आणि या प्रार्थनेसाठी वृध्द भाविकही उपस्थित असतात. याच गोष्टीचा फायदा चोरट्यांनी घेतला. रविवारी सकाळी डोंगरी, नावेली येथील रहिवासी इनोसेंट गोम्स (वय ६१) या सकाळी साडेआठ वाजता असलेल्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेल्या होत्या. प्रार्थना संपल्यानंतर, सकाळी साडेनऊ वाजता त्या घरी जाण्यासाठी निघाल्या असता, पर्पेच्युअल सर्कलनजीक दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी भरधाव वेगाने गाडी चालवत गोम्स यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढली आणि तेथून पळ काढला.
या प्रकारामुळे इनोसेंट गोम्स रस्त्यावर पडल्या आणि त्यांना दुचाकीचा क्रमांकही पाहता आला नाही. या घटनेनंतर इनोसेंट गोम्स यांनी त्यांचे पती डॉमनिक फर्नांडिस आणि सामाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह मडगाव पोलीस स्थानकात येऊन तक्रार दाखल केली.
ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचे म्हटले आहे. दुचाकीवरील चालकाने हेल्मेट घातलेले होते आणि ते गोम्स यांच्यावर पाळत ठेवून होते व त्यांना एकटे पाहून हा प्रकार घडला. यापूर्वीही नावेलीत सायंकाळी फिरायला गेलेल्या ७४ वर्षीय वृध्देची सोनसाखळी चोरी झाली होती. नावेली परिसरात सोनसाखळी चोरणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली असून, यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, वृध्द नागरिकांनीही घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन ॲड. कुतिन्हो यांनी केले आहे.