डिचोली : ‘माझे घर’ योजनेतही एजंट सक्रिय!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा गौप्यस्फोट : थेट अधिकाऱ्यांमार्फत काम करून घ्या

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
डिचोली : ‘माझे घर’ योजनेतही एजंट सक्रिय!

डिचोली : सरकारी जागांचे भूखंड करून त्यांची विक्री करण्याचे सत्र सध्या सुरू आहे. तसेच, ‘माझे घर’ योजनेच्या नावाखाली सोपस्कार पूर्ण करून पैसे उकळणारे एजंट्स देखील तयार झाले आहेत, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथील एका कार्यक्रमात केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना स्पष्ट आवाहन केले की, अशा एजंट लोकांकडे न जाता, त्यांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांकडूनच आपली कामे करून घ्यावीत. एजंटगिरीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘माझे घर’ योजनेचा शुभारंभ मये येथून करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, मयेवासीयांनी गेली अनेक वर्षे बरेच कष्ट सहन केले. आज आमच्या सरकारने प्रत्येकाला घराचे मालकी हक्क प्रदान करण्याचा आगळावेगळा ऐतिहासिक निर्णय घेऊन मयेवासियांना तसेच गोमंतकीय जनतेला दिलासा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

* तणावमुक्त परिवार: ‘माझे घर’ योजना ही क्रांतिकारक असून, यामुळे कुटुंबांतील अंतर्गत कलह दूर होऊन मानसिक आरोग्य सुदृढ होईल.

* ६ महिन्यांची मुदत: मुख्यमंत्र्यांनी ‘माझे घर’ योजनेच्या नऊ प्रकारच्या अर्जांबाबत सविस्तर माहिती दिली आणि आगामी सहा महिन्यांत हे अर्ज भरण्यासाठी मुदत असल्याचे सांगितले.

* अधिकाऱ्यांना सूचना: सरकारी अधिकाऱ्यांनीही कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता निर्धारित वेळेत सर्वांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

बेकायदेशीर बांधकामांना कठोर इशारा

एकीकडे सरकार १९७२ पूर्वीची घरे कायदेशीर करत असताना आणि 'माझे घर' योजनेतून सनद व कायदेशीर स्वरूप प्राप्त करून देत असताना, दुसरीकडे काही लोक अजूनही सरकारी जमीन बळकावून बेकायदेशीर घरे बांधण्याचा खटाटोप करत आहेत, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. यापुढे सरकारी जमिनीत घरे बांधल्यास किंवा बेकायदेशीर कृत्ये केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमास खासदार सदानंद तानावडे, आमदार प्रेमेंद्र शेट आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांच्यासह अनेक सरकारी अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा