अंतर्गत मार्गांवर वाहतूक कोंडी : खोळंबलेली वाहतूक मॅनेज करण्यासाठी हातावर मोजण्याइतके होमगार्ड तैनात
पणजी: पीडबल्यूडीने पर्वरी येथील सहा पदरी उड्डाणपुलाच्या बांधकामाला गती देण्यासाठी एक अनोखा 'ट्रायल रन' (चाचणी) घेण्याचे ठरवले. मात्र, आज, सोमवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६च्या काही भागावर घेण्यात आलेला हा 'ट्रायल रन' पूर्णपणे फसला. या अवघ्या तीन तासांच्या चाचणीने पर्वरी परिसरात वाहतुकीचा प्रचंड खोळंबा केला आणि कामगार वर्ग, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि नेहमीच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावर मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
अपुऱ्या नियोजनामुळे ट्रायल फिस्कटला.
सहा पदरी उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद करण्यापूर्वी नेमकी काय परिस्थिती उद्भवू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती. पर्यायी मार्गांवरही वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे दिसून आले. महामार्गावरील वाहतूक नियोजन न करताच अंतर्गत रस्त्यांवर (सर्व्हिस रोडवर) वळवण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीची भीषण समस्या निर्माण झाली. आराडी जंक्शनपासून ते सुकूर चर्चपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आराडी-सुकूर आणि चोगम या दोन्ही पर्यायी मार्गांवरही वाहतूक ठप्प झाली होती. या कोंडीमुळे अनेक नागरिकांची ऑफिसची वेळ चुकली, तर मुले शाळेत उशिरा पोहोचली.
या भयंकर कोंडीमुळे अनेक नागरिकांची ऑफिसची वेळ चुकली, तर शाळकरी मुलांनाही उशिरा शाळेत पोहोचावे लागले. या कोंडीत भर म्हणून 'ट्रायल रन' सुरू असताना एका लहानशा अपघातामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आणि वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली.
नियोजनशून्यतेमुळे नागरिकांचा संताप
एकीकडे पीडब्ल्यूडीचा उद्देश महत्त्वाचा असला तरी, या चाचणीतील नियोजनशून्यता ठळकपणे समोर आली. तिस्क ते सुकूर चर्च या महत्त्वाच्या पट्ट्यात ६०० हून अधिक चारचाकी वाहने जात असताना, सुरक्षेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी केवळ ६ पोलीस आणि होमगार्ड तैनात होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे 'ट्रायल रन'चा उद्देश सफल न होता नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
या अपयशी चाचणीने हे स्पष्ट केले आहे की, सद्यस्थितीत पर्यायी मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आता पीडब्ल्यूडी आणि प्रशासनाने उड्डाणपूलाचे काम पूर्ण करण्यासाठी नवीन वाहतूक नियंत्रण योजना अधिक गांभीर्याने आणि प्रभावीपणे आखण्यावर विचार करावा अशी मागणी होत आहे.