गोव्यात मासळीचे प्रमाण घटतेय? : मच्छीमार म्हणतात.. बेकायदेशीर मासेमारीचा परिणाम

उत्पादन तेवढेच; मात्र, काही मासळी मिळण्याचे प्रमाण कमीजास्त : मत्स्य खात्याच्या संचालक डॉ. मोंतेरो

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
गोव्यात मासळीचे प्रमाण घटतेय? : मच्छीमार म्हणतात.. बेकायदेशीर मासेमारीचा परिणाम

पणजी : गोमंतकीयांचे मत्स्यप्रेम सर्वश्रूत आहे. मासळीचे प्रमाण घटतेय म्हटल्यावर त्यांची चिंता वाढते तर वाढते म्हटल्यावर खूष होतात. गोव्यात मासळीचे प्रमाण वाढतेय की कमी होतेय यावर नेहमीच चर्चा होत असते. मच्छीमार तर नेहमीच मासळीत घट होत असल्याचा दावा करतात. मात्र, मत्स्त्योद्योग खाते म्हणते मासळीत घट होत नाही तर हवामान, पर्यावरण, मासेमारीची साखळी यावरून काही मासळी कमीजास्त प्रमाणात मिळत असते. ट्रॉलर, बोटींची वाढती संख्या, बेकायदेशीरपणे केली जाणारी मासेमारी यामुळे गोव्यात मासेमारीत घट होत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.  मच्छीमारांच्या जाळयात बांगडे, तारले, टुना यासारखे मासळी बम्पर मिळते. पापलेट, इसवण यासारख्या मासळीचे प्रमाण कमी होत आहे. मच्छीमार खात्याची आकडेवारीही तेच दर्शवतेय. 

आकडेवारी काय सांगतेय

समुद्रात केल्या गेलेल्या मासेमारीतून गेल्या दहा वर्षांत गोव्यात ११ लाख, ६२ हजार २३७ टन एवढे मासळीचे उत्पादन प्राप्त झाले. जानेवारी, २०१५ ते मार्च, २०१५ पर्यंतची ही आकडेवारी आहे. या आकडेवारीत सर्वात जास्त उत्पादन बांगड्यांचे, त्यानंतर अनुक्रमाने तारले व टुना मासळी आहे. 

दहा वर्षांत बांगड्यांचे उत्पादन ३,३८,०९३ टन, तारले २, ३८, ३५० टन, टुना मासळी १,०३, ५०५ एवढी टन मिळाली आहे. दहा वर्षांतील आकडेवारीत पहिल्या तीन वर्षांत तारलीचे उत्पादन चांगले होते, मात्र, त्यानंतर त्यात घट होत असल्याचे दिसत आहे.  इसवणचे उत्पादन चिंताजनक आहे. दहा वर्षांत केवळ २४, ६८९ एवढेच इसवणचे उत्पादन मिळाले आहे. कोळंबी ७१ हजार, १९० टन एवढी मिळाली. माणकी २७ हजार, ६५६ टन, बाळे २६ हजार, ३४७ टन, गोब्रो ८ हजार, ०७८ टन, वेर्ली ५ हजार, ११४ टन, खापी ३४ हजार, ८१९ टन, लेपो १९ हजार, ९०१ टन, मोरी ४ हजार, ५७१ टन, कर्ली २ हजार, ६३६ टन, समुद्रातील खेकडे १३ हजार, ३८३ टन, दोडयारे २२ हजार, ११५ टन, सौंदाळे ७ हजार, ९३१ टन, चणक १ हजार, ४३४ टन एवढे मासळी उत्पादन झाल्याचे आकडेवारी दर्शवतेय. 

काय म्हणतात मच्छीमार

यासंदर्भात काही मच्छीमारांशी संवाद साधला असता, त्यातील काहीजणांनी नाव नमूद न करण्याच्या अटीवर सांगितले की, गोव्यात मासळी घटत आहे व त्याची कारणेही तशीच आहेत. ट्रॉलर, बोटींची वाढती संख्या, एलईडी, ‘बुट्टोल’द्वारे केली जाणारी मासेमारी, लहरी हवामान, समुद्रात वारंवार निर्माण होणारे वादळ, तुफान, पडणारा पाऊस यामुळे मासळी सापडणे कठीण होत आहे. 

चंद्रा चोडणकर यांनी सांगितले की, गोव्यात बंदी असूनही एलईडी बोटींद्वारे खोल समुद्रात केली जाणारी मासेमारी सर्वात घातक ठरत आहे. मत्स्यबीजच नष्ट होत आहे. ‘बुट्टोल’ म्हणजेच दोन बोटींवर केली जाणारी मासेमारीही मत्स्य उत्पादनाला फटका देणारी ठरत आहे. 

बी. जुवाटकर यांचे म्हणणे आहे की, पूर्वी काटाळी, रापण याप्रकारे पारंपारिक मासेमारी केली जात होती. मच्छीमार ही कमी होते. मात्र, आता पारंपारिक मासेमारी मागे पडत आहे. ट्रॉलर, बोटी यांची संख्या खूप वाढली आहे. झटपट पैसे कमावण्याच्या नादात कुठलेही धरबंद न ठेवता मासेमारी केली जात आहे. त्यातून मत्स्य बीज नष्ट होत आहे. गोव्यात मासेमारीवरील बंदीचा काळ केवळ दोन महिन्यांचा आहे. बंदी उठवल्यावर मासेमारी करण्यासाठी सर्वजण तुटून पडत असतात. त्यावेळी ही मत्स्यबीज नष्ट होत असते. मासेमारीवरील बंदीचा काळ वाढवून पाहणे गरजेचे आहे. 

बाबुली पागी यांनी सांगितले की, गोव्याबाहेरील कर्नाटक, महाराष्ट्रातील बोटी गोव्यात येऊन मासेमारी करीत असतात. मालवणच्या बोटी तर सर्रास गोव्यात येत असतात. त्याचा फटका मच्छीमारांना बसत आहे. त्यामुळे मत्स्य धन ही घटत आहे.

एकूण प्रमाणात घट नाही : संचालक मोंतेरो 

मत्स्योद्योग खात्याच्या संचालक डॉ. शर्मिला मोंतेरो यांनी सांगितले की, गोव्यात मासेमारी कमी झालेली नाही. वर्षभर मिळत असलेल्या मासळीच्या एकूण प्रमाणात घट झालेली नाही. मात्र, लहरी हवामान, पर्यावरणातील बदल, मासळीची साखळी याप्रमाणे काही विशिष्ट मासळीचे प्रमाण कमी जास्त होत असते. कधी बांगडे जास्त मिळत असतात तर कधी तारले जास्त मिळतात. गोव्यात मत्स्य व्यवसाय वाढावा म्हणून अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. 



हेही वाचा