नवी दिल्ली : प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी आता कबुतरांविरुद्ध कॉमेंटरी सुरू केली आहे. जागतिक क्रिकेटच्या मैदानावरील क्रिकेट (Cricket) समालोचक असलेले हर्षा भोगले (Harsha Bhogale) कबुतरांच्या (Piegon) विरोधातील जागृतीत सहभागी झाल्याने आता या मोहीमेला बळकटी मिळणार असल्याचे मानले जात आहे.
कबुतरांमुळे पसरणारी रोगराई, कबुतरखान्यांच्या आसपास राहत असलेल्या लोकांमध्ये असलेल्या आरोग्याच्या समस्या यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने यापू्र्वीच कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याला काहीजणांकडून विरोध होऊ लागल्याने हा विषय तापला आहे.
अशी स्थिती असताना क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी कबुतरांमुळे निर्माण होत असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
दिल्लीतही कबुतरांची मोठी समस्या
भोगले यांनी म्हटले आहे की, मुंबईप्रमाणे दिल्लीतही कबुतरांची मोठी समस्या आहे. एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेली बातमी एक्स वरील मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफार्मवर शेअर करीत त्यांनी या समस्येकडे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर कबुतरांमुळे निर्माण होत असलेल्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधत असताना काहीजण मोकळ्या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकत आहेत. दिल्लीतल्या एका मैदानात कबुतरांना दाणे टाकत असलेल्या लोकांना पाहून आपल्याला वाईट वाटले असे हर्षा भोगले यांनी नमूद केले आहे.
माजी नगरसेवकाने मुलगी गमावली : हर्षा
पुण्यातील एका घटनेची माहिती हर्षा भोगले यांनी एक्सवर शेअर केली आहे. कबुतरांमुळे होत असलेल्या आजारांमुळे पुण्यातील माजी नगरसेवक शाम मानकर यांना आपली मुलगी गमवावी लागली. त्यानंतर त्यांनी कबुतरांविरोधात जागृती सुरू केली आहे. मात्र, दिल्लीतील एका मैदानात जात असताना आपण काही लोक कबुतरांच्या एका मोठ्या थव्याला दाणे टाकत असल्याचे पाहिले. हे दृश्य धक्कादायक होते व त्यामुळे माझे मन हेलावले. एका बाजूला डॉक्टर कबुतरांच्या विष्ठेमुळे किती गंभीर आजार होतात, फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत आहेत. याचे गांभीर्य ओळखून आरोग्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून आपण कबुतरांना दाणे टाकणे बंद करूया, असे आवाहन ही हर्षा भोगले यांनी केले आहे.