तामिळनाडू : २२ मुलांचे मृत्यूप्रकरण : ईडीचे चेन्नईत अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे

मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत चौकशी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
तामिळनाडू : २२ मुलांचे मृत्यूप्रकरण : ईडीचे चेन्नईत अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे

चेन्नई : कोल्ड्रिफ कफ सिरपचे प्राशन केल्यानंतर मध्यप्रदेशात अनेक बालकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. त्याला अनुसरूनच अंमलबजावणी संचालनालयाने (ED)  सोमवारी चेन्नईत (chennai) सात ठिकाणी छापे टाकले. मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए)  हे छापे टाकण्यात आले. तामिळनाडूच्या औषध नियंत्रण कार्यालायातील उच्च अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर ही छापेमारी करण्यात आली. छापे कोल्ड्र‌िफ सिरपचे उत्पादक (coldrif syrup)  श्रीसन फार्माशी जोडले गेले आहेत. मध्यप्रदेशात या कंपनीचे कफ सिरप घेतल्यानंतर अनेक बालकांचा मृत्यू झाल्याचे दिसून येताच अनेक राज्यांमध्ये त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली.

कोल्ड्र‌िफ कफ सिरपमुळे २२ मुले दगावली आहेत. पाच वर्षांखालील ही मुले आहेत. जास्त मृत्यू मध्यप्रदेशातील धिंदवाडा जिल्ह्यात तर काही मृत्यूप्रकरणे राजस्थानमध्ये नोंदवली गेली आहेत. मुलांच्या मृत्यूनंतर, तपासात असे दिसून आले की, सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (ड‌िइजी) या अत्यंत विषारी रसायनाची धोकादायक भेसळ होती. त्यानंतर श्रीसन फार्माचे मालक जी. रंगनाथन यांना मध्यप्रदेश पोलिसांच्या एसआयटी पथकाने ९ ऑक्टोबर रोजी अटक केली.

नियमांचे वारंवार उल्लंघन

तामिळनाडू अन्न आणि औषध प्रशासनाकडून (TNFDA) २०११ मध्ये परवाना मिळालेल्या कांचीपुरम येथील श्रीसन फार्माने निराशाजनक पायाभूत सु‌विधा आणि राष्ट्रीय औषध सुरक्षा नियमांचे वारंवार उल्लंघन असूनही दहा वर्षांपेक्षा जास्त काळ कामकाज सुरू ठेवले, असे सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्डे कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)  स्पष्ट केले आहे. 

अधिकारी निलंबित, मालमत्तेची झडती

ईडी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोडंबक्कम येथील श्रीसन फार्माचे मालक जी. रंगनाथन यांच्या निवासस्थानावर तसेच कंपनीच्या कांचीपुरम येथील उत्पादन युनिट आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. एजन्सीने तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाच्या संचालक दीपा आणि सहसंचालक कार्तिकेयन यांच्या मालकीच्या मालमत्तेची देखील झडती घेतली. श्रीसन फार्माला उत्पादन परवाने देण्यात कथित निष्काळजीपणा आणि संभाव्य भ्रष्टाचाराबद्दल अंतर्गत चौकशी होईपर्यंत दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

बेकायदेशीर आर्थ‌िक व्यवहार ?

ईडीच्या सूत्रांनी पुष्टी केली की एजन्सी औषध कंपनी आणि निलंबित अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक व्यवहार किंवा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाले आहेत का याचा तपास करत आहे. गेल्या दोन वर्षांत श्रीसनच्या सुविधांवर अनिवार्य तपासणी करण्यात औषध निरीक्षकांच्या अपयशावरही या चौकशीत लक्ष केंद्रीत केले आहे.

मूत्रपिंड निकामी, २२ मुले दगावली

तामिळनाडूतील सुंगुवरचत्रम येथून चालणाऱ्या श्रीसन फार्माने उत्पादित केलेले कोल्ड्रिफ सिरप भारतातील अनेक राज्यांमध्ये वितरित केले गेले. सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोलचे घातक प्रमाण आढळून आले, जे अँटीफ्रीझमध्ये वापरले जाणारे विषारी औद्योगिक सॉल्व्हेंट आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील मुलांमध्ये या दूषिततेमुळे तीव्र मूत्रपिंड निकामी झाले, ज्यामुळे २२ मुलांचा मृत्यू झाला.







हेही वाचा