पणजी : आज डिजीटल तंत्रज्ञानामुळे नवनवीन उपकरणे तयार होत आहेत. वर्क फ्रॉम होम ही संकल्पनाही वाढत आहे. डिजीटल तंत्रज्ञानामुळे दिव्यांगजनाना रोजगार देणे सहज शक्य आहे. डिजीटल तंत्रज्ञान हे भविष्यात दिव्यांगजनांसाठी वरदान ठरणार आहे, असे मत उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो यानी पर्पल महोत्सवातील परिसंवादात व्यक्त केले.
पणजीत सुरू असलेल्या पर्पल महोत्सवात विविध विषयांवर आधारीत परिसंवाद सुरू आहेत. विकास व कामाच्या स्थळांवर दिव्यांगजनांचा सहभाग या विषयावर परिसंवाद झाला. सेथू या संस्थेने परिसंवादाचे आयोजन केले होते.
आर्थिक, सामाजिक व औद्योगिक विकासात दिव्यांगजनाना अधिकाधिक संधी द्यायला हवी. दिव्यांगजनाना आधार देता, देता त्यांचा सुद्धा समाजाला आधार होऊ शकतो. यासाठी उद्योगांनी दिव्यांगजनान रोजगार द्यायला हवा. डिजीटल तंत्रज्ञान व वर्क फ्रॉम होम संकल्पनेचा आधार देत दिव्यांगजनांच्या कला कौशल्याचा उद्योगांनी उपयोग करून घ्यायला हवा, असे गुदिन्हो परिसंवादात बोलताना म्हणाले.