अमेरिका : नोबेल न मिळाल्याचा राग जिनपिंगवर? अमेरिकेने चीनवर लादले १०० टक्के टॅरिफ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th October, 02:42 pm
अमेरिका : नोबेल न मिळाल्याचा राग जिनपिंगवर? अमेरिकेने चीनवर लादले १०० टक्के टॅरिफ

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याचा राग चीनवर काढल्याचे बोलले जात आहे. चीनने 'रेअर अर्थ मिनरल्स'च्या निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर देत ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १०० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लावला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी होणारी भेटही रद्द करण्याची घोषणा केली आहे.

टॅरिफचे कारण: रेअर अर्थ मिनरल्स

चीनने नुकतेच 'रेअर अर्थ मिनरल्स' आणि त्यापासून बनलेल्या उत्पादनांच्या निर्यातीसाठी 'विशेष मंजुरी' घेणे अनिवार्य केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण आणि ग्रीन एनर्जी यांसारख्या उद्योगांसाठी 'रेअर अर्थ मिनरल्स' अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि चीन हा त्यांचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आहे. चीनच्या या निर्णयामुळे अमेरिका आणि जागतिक बाजारपेठेत मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता होती. यावर ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर तीव्र प्रतिक्रिया दिली.

ट्रम्प यांनी लावला १००% टॅरिफ

चीनच्या या भूमिके मुळे अमेरिका चीनवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावणार असून, हा निर्णय १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होईल. हा टॅरिफ चीनने सध्या अमेरिकेवर लावलेल्या कोणत्याही शुल्काव्यतिरिक्त असेल. ट्रम्प यांनी यापूर्वीच चीनला इशारा दिला होता की, जर चीनने 'रेअर अर्थ'चा निर्णय मागे घेतला नाही, तर अमेरिका चिनी वस्तूंवर 'हेंव्ही टॅरिफ' लावेल. त्यांनी म्हटले की, चीनचे हे पाऊल बाजारपेठेला आणि जगाला अडचणीत आणेल आणि याचा सर्वात जास्त तोटा चीनलाच होईल.

जिनपिंग यांच्यासोबतची भेट रद्द

टॅरिफची घोषणा करण्यासोबतच, ट्रम्प यांनी या महिन्याच्या अखेरीस दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेत चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटण्याची योजनाही रद्द केली. ट्रम्प म्हणाले, "मला दोन आठवड्यांनंतर दक्षिण कोरियामध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटायचे होते, पण आता तसे करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही." या टॅरिफमुळे वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यात 'ट्रेड वॉर' पुन्हा एकदा भडकू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा