जोधपूर : अभियांत्रिकी चमत्कार? विद्यार्थ्यांना मिळाले १०० पैकी १०३ ते १३७ गुण

Story: वेब न्यूज । गोवन वार्ता |
10th October, 01:42 pm
जोधपूर : अभियांत्रिकी चमत्कार? विद्यार्थ्यांना मिळाले १०० पैकी १०३ ते १३७ गुण

जोधपूर : परीक्षेत एखाद्या विद्यार्थ्याला १०० पैकी किती गुण पडू शकतात? १०० गुणांच्या पेपरमध्ये १०३ ते १३७ पर्यंत गुण मिळण्याचा चमत्कार घडला. आणि परीक्षा (Exam) दिलेल्या विद्यार्थ्यांना ही आश्चर्याचा धक्का बसला.  जोधपूर येथील एमबीएम अभियांत्रिकी (Engineering) विद्यापीठाच्या बीई दुसऱ्या सेमिस्टरच्या निकालात प्रात्यक्षिक व सत्रात्मक दोन्ही विभागांमध्ये ठरलेल्या गुणांपेक्षा जास्त गुण मिळण्याचा प्रकार घडला. त्यानंतर विद्यार्थी व अभियांत्रिकी विद्यापीठाचे शिक्षक, व्यवस्थापन ही अवाक् झाले.   प्रशासनाने तातडीने कारवाई करण्यास सुरूवात केली. वेबसाइटवरून निकाल काढला. ऑनलाइन (Online) निकाल तयार करण्यासाठी व अपलोड करण्यासाठी जबाबदार असलेल्या एजन्सीकडे स्पष्टीकरण मागण्यात आले. 

तांत्रिक त्रुटीमुळे घोळ

परीक्षा नियंत्रक अनिल गुप्ता यांनी सांगितले की, अपलोडिंग प्रक्रियेदरम्यान तांत्रिक त्रुटीमुळे हा घोळ निर्माण झाला. निकाल दुरुस्त करून लवकरच पुन्हा जाहीर केला जाणार. त्यानंतर विद्यार्थ्याना त्यांचे नेमके गुण कळतील. या वर्षी मे महिन्या बीई दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा घेण्यात आली होती. ८०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. निकाल तयार करताना अनेक चुका झाल्या. प्रॅ‌क्टिकल आणि सत्र विषयांच्या १०० गुणांच्या पेपरमध्ये १०३ ते १३७ पर्यंत गुण मिळाले होते. गुणांची बेरीज जुळत नव्हती. एका विद्यार्थ्याला पाच विषयांमध्ये १०० पेक्षा जास्त गुण देण्यात आले. अभियांत्रिकी मेकॅनिक्स लॅब विषयात एका विद्यार्थ्याला १०० पैकी १३७ तर रसायनशास्त्र प्रयोगशाळेत, १०० पैकी १२३ गुण मिळाले. या विद्यार्थ्यांसाठी एकूण ६०० पैकी २१९ गुण दाखवले गेले. गुणपत्रिका ६७५ एवढी वाढली. सुधारीत निकाल लवकरच वेबसाइटवर अपलोड केले जाणार गुप्ता यांनी सांगितले.

हेही वाचा