समोर आले पत्नीचे प्रेमप्रकरण तरीही पतीने दाखवला संयम; म्हणाला- भावनांपेक्षा शांतता महत्त्वाची!
जकार्ता: प्रेमाचे गुंतागुंतीचे आणि विचित्र 'फॉर्म्युले' आणि ते प्रत्यक्षात वापरणारे महाभाग काही कमी नाहीत, पण इंडोनेशियातील एका पतीने जे केले, ते ऐकून तुम्हाला हसावे की रडावे हेच कळणार नाही. एका धक्कादायक आणि काहीशा गमतीशीर घटनेत, इंडोनेशियातील दक्षिण-पूर्व सुलावेसी प्रांतातील कोनाताये जिल्ह्यात एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराकडे सोपवले आणि या 'देवाणघेवाणी'त प्रियकराकडून चक्क एक गाय घेतली.
'बायको' गेली, पण 'कामधेनू' मिळाली!
स्थानिक वृत्तानुसार, पती-पत्नीचा संसार लग्नाच्या काही महिन्यांनंतरच बिघडला, कारण पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले होते. सुरुवातीला दोघांत खटके उडाले. जेव्हा पत्नीच्या प्रियकराला ही गोष्ट समजली, तेव्हा त्याने थेट पतीसमोर एक विचित्र पण 'शांततापूर्ण' प्रस्ताव ठेवला. तो म्हणाला, मला तुझी पत्नी दे, मी तुला त्या बदल्यात एक गाय देईन आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पतीने हा प्रस्ताव मान्यही केला! हा 'आदान-प्रदान' विधी एका औपचारिक समारंभात पार पडला, जिथे पत्नी पारंपरिक वेशभूषेत उभी होती. या 'व्यवहारात' पतीने प्रियकराकडून एक गाय, एक स्टीलची किटली आणि सुमारे २५०० रुपये रोख रक्कम (५,००,००० इंडोनेशियन रुपिया) स्वीकारली.
'मोसे सरोप' - तौलाकी जमातीची परंपरा
हा संपूर्ण सोपस्कार तौलाकी जमातीच्या 'मोसे सरोप' किंवा 'मोसेहे' नावाच्या जुन्या परंपरेनुसार झाला, ज्याचा साधा अर्थ 'सोपवणे आणि निघून जाणे' असा आहे. तौलाकी समुदायाच्या मान्यतेनुसार, जेव्हा वैवाहिक संबंधांमध्ये मतभेद होतात, तेव्हा संघर्षाऐवजी तोडगा काढण्यासाठी हा औपचारिक करार केला जातो. पत्नीला स्वीकारणाऱ्या प्रियकराकडून पतीला भरपाई म्हणून पशूधन, घरगुती वस्तू किंवा पैसे दिले जातात. यावेळी व्हिडिओमध्ये पती डोळ्यात अश्रू आणून पत्नीला प्रियकराकडे सोपवताना शांतपणे उभा होता, तर बाजूला प्रियकर हसत होता.
भावनांपेक्षा शांतता महत्त्वाची!
या अनोख्या घटस्फोटाबद्दल पतीने नंतर एक हृदयस्पर्शी आणि समजूतदार स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, "मी बदला घेण्याच्या भावनेऐवजी शांतता निवडली. दोन्ही कुटुंबांचा सन्मान वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. आता आम्ही तिघेही (पती, पत्नी आणि प्रियकर) आनंदी आहोत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका बाजूला पतीने दाखवलेल्या 'समजूतदारपणा'ची चर्चा आहे, तर दुसऱ्या बाजूला महिलांच्या हक्कांचे हे उघड उल्लंघन आहे का, यावरही मोठा वाद निर्माण झाला आहे.