पोलीस अधीक्षकांकडून स्पष्ट : आतापर्यंतची कारवाई निष्पक्ष, जलद गतीने, नव्या दाव्याचीही सत्यता तपासणार
पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता. सोबत पोलीस महासंचालक अलोक कुमार.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : रामा काणकोणकर यांनी दिलेल्या जबाबात राजकारण्याच्या सहभागाचा दावा केला नव्हता. मात्र त्यांनी नव्याने केलेल्या दाव्यानुसार या प्रकरणाची चौकशी केली जाईल. रामा आणि त्याच्या कुटुंबियांना पोलीस सुरक्षा दिली आहे अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकर यांना तब्बल २३ दिवसांनी, शनिवारी गोमेकॉतून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्यांच्यावरील हल्ल्यात दोन मंत्र्यांचा हात असल्याची शंका व्यक्त केली होती. या संदर्भात तपासाची माहिती देण्यासाठी पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अधीक्षक गुप्ता बोलत होते. उपअधीक्षक तथा तपास अधिकारी सुदेश नाईक आणि निरीक्षक विजयकुमार चोडणकर हेही यावेळी उपस्थित होते.
करंझाळे येथे १८ सप्टेंबर रोजी काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणात सहभाग असलेल्या सराईत गुन्हेगार अँथनी नादार, फ्रान्सिस नादार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर, सुरेश नाईक, फ्रांको डिकॉस्टा आणि साईराज गोवेकर या सात संशयितांना अटक केली होती. त्यातील काही संशयितांच्या जबाबावरून पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याला अटक केली. यानंतर काणकोणकर यांचा जबाब नोंद करण्याचा पोलिसांनी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अनेकदा प्रयत्न केला. पण काणकोणकर यांनी जबाब देण्यास नकार दिला होता. अखेर २ ऑक्टोबर रोजी काणकोणकर यांनी पोलिसांना जबाब दिला. जबाबात त्यांनी मिंगेल आरावजो हा पाठलाग करत असल्याचे, तसेच मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला ‘गावडा’ आणि ‘राखणदार’ म्हटल्याचे सांगितले होते. याची दखल घेऊन पोलिसांनी गुन्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (छळ प्रतिबंध) कायद्याअंतर्गत कलम जोडले होते. प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे सोपवण्यात आला होता. याच दरम्यान जेनिटो कार्दोझने जामीन अर्ज दाखल केला. त्याला काणकोणकर यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून विरोध केल्याची माहिती अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
शनिवारी काणकोणकर यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी दोन राजकारणी हल्ल्यामागे असल्याची शंका व्यक्त केली. याची दखल घेऊन आवश्यकता भासल्यास काणकोणकर यांचा पुरवणी जबाब नोंद केला जाईल. काणकोणकर यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंद करण्याची तरतूद आहे, अशी माहिती अधीक्षक गुप्ता यांनी दिली.
हल्ल्याचा तपास गुणवत्तापूर्ण आणि बारकाईने : तपास अधिकारी
रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा तपास गुणवत्तापूर्ण आणि बारकाईने सुुरू आहे. आतापर्यंत आठ जणांवर कारवाई झाली आहे. जेनिटो कार्दोझ याच्या जामीन अर्जाला आम्ही विरोध केला आहे. काणकोणकर यांच्या जबाबाची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आली आहे. त्यावेळी त्यांनी राजकारण्यांच्या सहभागाबाबत माहिती दिली नव्हती. त्यांनी केलेल्या नव्या दाव्यानुसार चौकशी केली जाईल, असे तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी स्पष्ट केले.
रामा काणकोणकर यांचा जबाब नोंद करण्यात आला होता. त्याने डिस्चार्ज मिळाल्यानंतर गंभीर दावा केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी निष्पक्ष आणि जलद चौकशी केली आहे. रामा यांच्या नव्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी पोलीस तपास करण्यात येईल.
_ आलोक कुमार, पोलीस महासंचालक