दरोडेखोरांच्या शोधार्थ गोवा पोलीस बांगलादेशाच्या सीमेवर

गणेशपुरी-म्हापसा दरोड्यातील मुख्य संशयित फरारच


12th October, 11:56 pm
दरोडेखोरांच्या शोधार्थ गोवा पोलीस बांगलादेशाच्या सीमेवर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : म्हापसा येथील डाॅ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकलेल्यांना मदत केलेल्या तिघांना कर्नाटकमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, उत्तर गोवा पोलीस आणि गुन्हा शाखेचे मिळून १४ पथके अजूनही गोव्याबाहेर आहेत. त्यातील दोन पथके बांगलादेशाच्या सीमेच्या परिसरात आहेत. तेथे ते संशयित ठिकाणांवर छापे टाकत आहेत. दरम्यान, गोव्यात एटीएम चोरीत सहभागी असलेले संशयित वरील दरोडेखोरांच्या टोळीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सहा बुरखाधारी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला होता. घाणेकर कुटुंबियांना बंधक बनवून घरातील ३५ लाखांचा मुद्देमाल पळवला होता. त्यानंतर दरोडेखोरांनी पणजीतून टॅक्सीद्वारे बेळगाव गाठले. याची माहिती मिळल्यानंतर गोवा पोलिसांचे पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आले. दरम्यान, दरोडेखोरे बेळगाव, बंगळुरूमार्गे विजयवाडा येथे पोहोचल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, उत्तर गोवा पोलीस आणि गुन्हा शाखेचे पोलीस मिळून १४ पथके गोव्याबाहेर रवाना करण्यात आली अाहेत. दरोडेखोर विजयवाडा येथे पोहोचल्यानंतर भूमिगत झाले आहेत. पोलिसांची पथके वेगवेगळ्या राज्यांत दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. दोन पथके बांगलादेश सीमेच्या परिसरात छापासत्र करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरोडेखोरांना मदत करणाऱ्या तिघांना बंगळुरूतून अटक
पोलिसांनी दरोडेखोरांना मदत करणाऱ्या सुमारे १४ जणांची प्राथमिक चौकशी करून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या तिघांनी दरोडेखोरांना बंगळुरूमध्ये मदत केल्याची माहिती मिळाली आहे. दरोडेखोर बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले असून ते बांगलादेशात पसार होण्याची शक्यता आहे. दरोडेखोर देशात वेगवेगळ्या राज्यांत झालेल्या एटीएम चोरीतही सहभागी होते, अशी माहिती मिळाली आहे. पोलीस पथक तिघांना घेऊन सोमवारी रात्री किंवा मंगळवारी गोव्यात दाखल होणार आहे.