‘फॉर्म्युला ४’ रेस स्थानिकांच्या विरोधामुळे मुरगावात होणार नाही

मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट : स्थळ, तारीख नंतर होणार जाहीर


11th October, 11:24 pm
‘फॉर्म्युला ४’ रेस स्थानिकांच्या विरोधामुळे मुरगावात होणार नाही

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आमदार संकल्प आमोणकर आणि आमदार दाजी साळकर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : ‘फॉर्म्युला ४’ रेस मुरगाववासीयांना नको असल्यामुळे आम्ही रेसचे स्थळ बदलत आहोत. रेसची तारीख पुढे ढकलत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मुरगाव व गोव्याच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळण्याची सुवर्णसंधी लोकांनी गमावली असल्याचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यावेळी म्हणाले. रेस होऊ नये यासाठी काही राजकारण्यांनी मला लक्ष्य केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बोगदा परिसरात ३१ ऑक्टोबर, १ व २ नोव्हेंबर रोजी ‘फॉर्म्युला ४’चे आयोजन करण्यात आले होते. ट्रॅक करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू होते. तथापि रेसमुळे स्थानिकांना समस्यांना सामोरे जावे लागले, सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, अशा आशयाचे निवेदन काही लोकांनी प्रशासनाला दिले होते. दोन दिवसांपूर्वी जाहीर सभा घेऊन रेस इतरत्र हालविण्याची मागणी करण्यात आली होती. मुरगाव पालिका बैठकीत शुक्रवारी काही नगरसेवकांनी रेससंदर्भात चर्चा करण्यास न दिल्यामुळे बैठकीवर बहिष्कार घातला होता. परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवारी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बोगदा येथे ट्रॅकची पाहणी केली. त्यानंतर नगरसेवकांसोबत बैठक घेतली. नंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रेस इतरत्र घेण्याचा निर्णय जाहीर केला.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मुरगावातील महिला मोठ्या संख्येने रवींद्र भवन परिसरात जमल्या होत्या. विरोध करणारे काही सामाजिक कार्यकर्तेही तेथे आले होते.
सर्व गोष्टींचा विचार करून ‘फॉर्म्युला ४’ रेसचे मुरगावातआयोजन करण्यात आले होते. आयोजकांनी जागेेची पाहणी केली होती. रेसमुळे पर्यटन व अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली असती. मुरगावचा विचार करून रेस येथे घेण्याचा विचार होता. रेस तीन दिवस होणार होती. बोगदा येथे फक्त ४०० मीटर रस्त्याचा प्रश्न होता. आयोजकांनी पर्यायी रस्ता देण्याचे मान्य केले होते. परंतु लोकांना रेस येथे नको असल्याने आम्ही रेसचे स्थळ बदलत आहोत.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री