राज्यातून एका वर्षात ५५३ जण बेपत्ता

एनसीआरबीचा अहवाल : ५०७ जणांना शोधण्यात यश


11th October, 11:33 pm
राज्यातून एका वर्षात ५५३ जण बेपत्ता

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातून २०२३ मध्ये ५५३ व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली होती. यामध्ये ३१० पुरुष आणि २४३ महिला होत्या. पोलिसांना २०२३ अखेरीस याआधीच्या वर्षांमधील तसेच २०२३ या वर्षातील मिळून २७७, पुरुष तर २३० महिला अशा एकूण ५०७ जणांना शोधण्यात अथवा त्यांचा मागोवा घेण्यात यश आले. ९७५ जणांचा शोध लागला नव्हता. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, २०२३ अखेरीस ९६३ पुरुष आणि ५१९ महिला मिळून १,४८२ व्यक्ती बेपत्ता होत्या. बेपत्ता महिला सापडण्याचे प्रमाण ४४.३ टक्के, तर पुरुषांचे प्रमाण २८.८ टक्के होते. बेपत्ता व्यक्ती सापडण्याचे एकूण प्रमाण ३४.२ टक्के राहिले. याची राष्ट्रीय सरासरी ५३.८ टक्के होती. केरळ, नागालँड, तेलंगणा, आसाम येथे हेच प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक होते. ओडिशा, पंजाब, गोवा, झारखंड येथे हरवलेल्या व्यक्ती सापडण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते.
२०२३ अखेरीस गोव्यातील १८ वर्षांखालील ४८ मुले बेपत्ता होती. यामध्ये २८ मुले आणि २० मुली होत्या. पोलिसांना २०२३ अखेरीस याआधीच्या वर्षांमधील तसेच २०२३ या वर्षातील मिळून ९ मुले आणि ८ मुली अशा एकूण १७ जणांना शोधण्यात यश आले. बेपत्ता मुले सापडण्याचे प्रमाण ३२.१ टक्के, तर मुली सोपडण्याचे प्रमाण ४० टक्के होते. १८ वर्षांखालील बेपत्ता मुले सापडण्याची राष्ट्रीय सरासरी ६५.९ टक्के होती. केरळ, त्रिपुरा येथे हेच प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक होते.
एका वर्षात अपहरणाचे ८५ गुन्हे
राज्यात २०२३ मध्ये अपहरण व पळवून नेल्या प्रकरणी ८५ गुन्हे नोंद झाले. यामध्ये ५३ महिला आणि ३२ पुरुषांचा समावेश होता. पूर्वीची आकडेवारी मिळून २०२३ अखेरीस राज्यात एकूण १५५ अपहरण प्रकरणांचा छडा लागला नव्हता. यातील ११० महिला पीडित होत्या.