दोन मंत्र्यांवर संशय व्यक्त : निवृत्त न्यायाधिशांमार्फत तपासाची मागणी
गोमेकॉतून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामा काणकोणकर. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना शनिवारी २४ दिवसांनंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून (गोमेकॉ) डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आपल्यावर झालेला हल्ला हा वैयक्तिक कारणातून झाला नसल्याचे सांगितले. हल्ल्यामागे दोन मंत्री असल्याचा संशयदेखील त्यांनी व्यक्त केला. याबाबत आपण दंडाधिकाऱ्यांकडे जबाब नोंदवण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळण्यात आले त्यानंतर आपला पोलिसांवर विश्वास राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रामा काणकोणकर यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तपास करण्याची मागणी केली. ते म्हणाले, यामागील मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड) कोण आहे याचा तपास पोलिसांनी करणे आवश्यक होते. मागील काही महिने आपल्यासोबत सुरू असलेले प्रकार पाहता पोलिसांना हल्ल्याबाबत माहिती होती. मी गोव्याच्या भल्यासाठी आवाज उठवत आहे; म्हणूनच माझ्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्यांनी मला ‘गावडे’, ‘राखणदार’ असे शब्द वापरले. माझ्या तोंडावर, डोक्यावर बुक्क्या मारल्या. मला चक्कर येऊन मी पडलो असताना माझ्या तोंडात शेण घातले. ‘तुला गोव्याचा राखणदार व्हायचे आहे का’, ‘आमच्या आमदाराचे नाव खराब करतोस का’, ‘तुला एसटी पोर्टफोलिओ हवा का’, असे प्रश्न विचारत ते मला मारत होते.
मंत्र्याच्या सहभागाची जबाबात पोलिसांकडून नोंद नाही !
पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी माझा जबाब नोंदवला. यावेळी सुमारे तीन तास मी जबाब दिला. जबाब व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वरूपातदेखील करण्यात आला होता; मात्र अजूनही तो आम्हाला देण्यात आलेला नाही. जबाबात मला कोणी मारले, हल्लेखोर काय म्हणाले, हल्ला कसा झाला याची माहिती दिली. हल्लेखोरांची आणि माझी वैयक्तिक दुश्मनी नसल्याचेही मी पोलिसांना सांगितले. माझ्यावर झालेला हल्ला हा सहा महिने नियोजन करून झाला होता. जबाबात आपण यामागे एक मंत्री असू शकतो, असे सांगितले होते. तसे लिहून घेण्यासही सांगितले होते. मात्र याची नोंद केली गेली नसल्याचे रामा यांनी सांगितले.