परदेशात नोकरीच्या नावाखाली बेकायदा व्यवसाय

बोर्डा-फातोर्डा येथे प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशनचा छापा : चौघेजण चौकशीसाठी ताब्यात


10th October, 11:41 pm
परदेशात नोकरीच्या नावाखाली बेकायदा व्यवसाय

‘पोर्तुगाल डायरेक्ट’ एजन्सीच्या कार्यालयात छापा टाकून तपासणी करताना प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशनचे अधिकारी. (संतोष मिरजकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशनकडून बोर्डा-फातोर्डा येथील ‘पोर्तुगाल डायरेक्ट’ नावाच्या परदेशी नोकरभरती एजन्सीवर छापा टाकण्यात आला. प्राथमिक तपासणीत सदर एजन्सीकडे कायदेशीर परवाना नसल्याचे दिसून आले. एजन्सीचे कार्यालय बंद करून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागाकडून परदेशात कामानिमित्ताने जाणार्‍या भारतीय कामगारांच्या हिताच्या रक्षणावर व स्थलांतरणावर देखरेख ठेवण्यात येते. बोर्डा-फातोर्डा येथील ‘पोर्तुगाल डायरेक्ट’ या एजन्सीकडून परदेशात दुबई, कतार, युएई, नेदरलँड अशा देशांत नोकरीसाठी जाहिराती काढून व्हिसा देण्यात येत होता. परदेशात कामाला लावण्याचे आश्वासन देऊन बेकायदेशीरपणे व्यवसाय केला जात होता. सदर एजन्सीकडे परदेशात नोकरीला पाठवण्यासाठी आवश्यक कायदेशीर परवाना नसल्याच्याही तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागाकडून शुक्रवारी सायंकाळी बोर्डा येथील ‘पोर्तुगाल डायरेक्ट’ आस्थापनाच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. सदर आस्थापन हे शेख शोएब नामक व्यक्तीचे आहे. बंगळुरू येथील प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागाकडून ‘पोर्तुगाल डायरेक्ट’ एजन्सीच्या कार्यालयाची पडताळणी करण्यात आली. त्यांच्याकडे कायदेशीर परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. सदर एजन्सीचे कार्यालय बंद करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका महिलेसह चार संशयितांना ताब्यात घेऊन फातोर्डा पोलीस स्थानकावर आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत संशयितांची चौकशी सुरू होती.