गणेशपुरी-म्हापसा सशस्त्र दरोड्यातील मुख्य चोर फरारच

अटक झाली ते मदतनीस : पाच दिवसांनंतरही तपासात प्रगती नाही


12th October, 04:36 am
गणेशपुरी-म्हापसा सशस्त्र दरोड्यातील मुख्य चोर फरारच

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : गणेशपुरी, म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणाला पाच दिवस उलटले आहेत. तरीही गोवा पोलिसांच्या हाती अद्याप मुख्य दरोडेखोर लागलेले नाहीत. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे; मात्र त्यांनी दरोड्यामध्ये मदतनीसाची भूमिका बजावली होती. मुख्य दरोडेखोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
हैदराबाद येथे अटक केलेल्या पाचही संशयितांना घेऊन गोवा पोलिसांची काही पथके माघारी परतली आहेत. या संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे मुख्य दरोडेखोरांना गजाआड करण्याचे प्रयत्न पोलीस करणार आहेत. मात्र मुख्य दरोडेखोर अंडरग्राऊंड झाल्यामुळे पोलीस तपासात अडचणी येत आहेत. पोलिसांच्या हाती ठोस असे काहीच लागलेले नाही. मुख्य दरोडेखोर अद्याप मोकाटच आहेत.
पोलीस महासंचालक अलोक कुमार यांच्या देखरेखीखाली उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, म्हापसाचे उपअधीक्षक विल्सन डिसोझा व गुन्हा शाखेचे उपअधीक्षक सूरज हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा पोलीस या दरोडा प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे; मात्र त्यांच्याकडून काय माहिती मिळाली याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांनी अद्याप उघड झालेली नाही. त्यामुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि दरोडा प्रकरणातील तपासाच्या प्रगतीबाबत गणेशपुरीतील नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, संशयित दरोडेखोरांची रेखाचित्रे आणि तांत्रिक माध्यमाच्या आधारे पाच संशयितांचा मागाेवा काढत त्यांना अटक केली आहे. मात्र हे संशयित मुख्य दरोडेखोर नसून या दरोड्यात संशयितांना मदत करणारे आहेत. पोलिसांकडून त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान डॉ. घाणेकर यांच्या घरावर सहा बुरखाधारी दरोडेखोरांनी दरोडा घातला होता. घाणेकर कुटुंबियांना बंधक बनवून घरातील ३५ लाखांचा मुद्देमाल पळवला होता. मात्र घटनेला पाच दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती मुख्य संशयितांचे काहीच धागेदोरे लागू शकलेले नाहीत.
दरोडा प्रकरणातील काही अनुत्तरित प्रश्न
१. लाल स्विफ्ट कार कुणाची ? ती कुठे गेली ?
२. दरोडेखोरांना स्थानिकांनी मदत केली आहे का ?
३. पळवून नेलेला ऐवज कुठे गेला ?