मुख्य टोळीचा शोध जारी : पाचही संशयितांना आज गोव्यात आणण्याची शक्यता
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : गणेशपुरी येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या घरावरील दरोडाप्रकरणी म्हापसा पोलिसांनी पश्चिम बंगालमधील एकूण पाच जणांना अटक केली आहे. संशयित हे मुख्य दरोडेखोर नाहीत, गुन्ह्यावेळी दरोडेखोर टोळीला त्यांनी मदत केल्याचे चौकशीतून उघडकीस आले असून गोवा पोलिसांनी विविध शहरांत पाठवलेली पथके मुख्य संशयितांचा शोध घेत आहेत.
दरोडा टाकून दरोडेखोर पणजीहून चोर्लाघाट मार्गे बेळगावला गेले. तिथून पुढे ते हैदराबाद व बंगळूरूच्या दिशेने गेले. या माहितीच्या आधारे गोवा पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली होती. दरोडेखोरांची टोळी बांगलादेशी असल्याचे पोलीस चौकशीतून उघडकीस आले आहे. देशाची सीमा ओलांडून बांगलादेशात जाण्याचा दरोडेखोरांचा प्लॅन होता. दोनापावला येथील धेंपो यांच्या बंगल्यावर दरोडा घातल्यानंतर ते चार महिने अशाच प्रकारे अंडरग्राऊंड होते.
गोवा पोलीस दरोडेखोर टोळीचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक गोष्टींची मदत घेत आहेत. मात्र मुख्य दरोडेखोरांचा ठावठिकाणा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. संशयितांना पकडण्यासाठी पोलीस परिश्रम घेत आहेत. पोलिसांना या दरोड्याशी संबंध असलेल्या पाच संशयितांना पकडण्यात यश आले आहे. मात्र अटक केलेल्या संशयितांनी मतदनीस म्हणून कामगिरी बजावली होती. हा दरोडा रेकी करून टाकला होता. त्यामुळे या प्रकरणात ८-१० जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान, मंगळवार, ७ रोजी डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडला होता. पीडित कुटुंबियांना बंधक बनवून बुरखाधारी दरोडेखोरांनी बंगल्यातून कारसह ३५ लाखांचा ऐवज पळविला होता. या घटनेला चार दिवस उलटले तरीही पोलिसांच्या हाती ठोस असे काही लागलेले नाही. अटक केलेल्या पाचही संशयितांना शनिवारी गोव्यात आणले जाण्याची शक्यता आहे.
दरोडेखोर देशाची सीमा ओलांडू नयेत यासाठी सतर्कता
दरोडेखोरांना पकडण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रमध्ये पाठविलेली पोलीस पथके गोव्यात परतली आहेत. काही पथके हैदराबाद, मुंबई, बंगळुरूमध्ये तळ ठोकून आहेत. संशयित दरोडेखोर देशाची सीमा पार करू नयेत म्हणून सीमा सुरक्षा दलाला सतर्क करण्यात आले आहे. या प्रकरणाचा यशस्वी छडा लावण्याचा चंग पोलिसांनी बांधला असून तपासकामात कमालीची गुप्तता बाळगली आहे. त्यामुळे कुणीही पोलीस अधिकारी अधिकृत माहिती देण्यास पुढे येत नाही.