५३५.९८ कोटींच्या जीएसटी इनपुट घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल

‘डीजीजीआय’च्या गोवा विभागाची म्होरक्या विरोधात कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th October, 11:52 pm
५३५.९८ कोटींच्या जीएसटी इनपुट घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल

पणजी : गोव्यात दोन आस्थापने सुरू करून बनावट बिलांद्वारे सुमारे ५३५.९८ कोटी रुपयांचा जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला होता. या प्रकरणी जीएसटी इंटेलिजेन्स महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) गोवा विभागाने आंतरराज्य टोळीचा म्होरक्या पुखराज किशना राम (मूळ रा. राजस्थान) याच्या विरोधात म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
राज्यात बनावट बिलांद्वारे जीएसटी घोटाळा होत असल्याची माहिती डीजीजीआयच्या गोवा विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी प्राथमिक चौकशी केली असता, पेडणे तालुक्यातील चोपडे आणि बार्देश तालुक्यातील शिवोली येथील ‘अभिषेक होम अप्लायन्सेस’ व ‘संदीप होम अप्लायन्सेस’ या दोन आस्थापनांच्या माध्यमातून घोटाळा होत असल्याचे समोर आले. त्यानुसार, वरील आस्थापनांनी मिळून तब्बल १९० कोटी रुपयांची उलाढाल दाखवली, मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर बनावट इनव्हॉइसिंग व बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) दावे करण्यात आल्याचेही उघड झाले. याच दरम्यान डीजीजीआयने वरील आस्थापनांच्या जीएसटी क्रमांकासंदर्भातील मोबाईल क्रमांकांची खातरजमा केली असता, वेगवेगळे मोबाईल क्रमांकद्वारे ६९ आस्थापनांमध्ये वापरला गेल्याचे आढळले. या क्रमांकाद्वारे बनावट बिल तयार करणे, आयटीसी दावे करणे, बँक खाती उघडणे तसेच बनावट आधारकार्ड तयार करणे असे अनेक व्यवहार झालेले दिसून आले. मोबाईल लोकेशन तपासल्यानंतर या क्रमांकाचा वापर चेन्नई, बंगळुरू आणि आंध्रप्रदेशातील व्यक्तींनी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वरील ठिकाणी विभागाने ३१ जुलै रोजी छापेमारी करण्यात आली. त्यावेळी विभागाने चेन्नईतून पुखराज किशना राम (मूळ राजस्थान) या म्होरक्याला अटक केली. पुखराजला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने प्रथम जीएसटी विभागाची कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
पुढील सुनावणी १६ ऑक्टोबर रोजी
या प्रकरणी डीजीजीआय गोवा विभागाने अधिक चौकशी केली असता, संशयिताने ६९ आस्थापनाद्वारे सुमारे १,३४०.५१ कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे दाखवण्यात आले. त्यानुसार, २७६.४९ कोटी रुपयांची इनपुट टॅक्स क्रेडिट दावा केले तसेच २५९.४७ कोटी रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट दावे इतर आस्थापनांना दिले. त्यामुळे वस्तू किंवा सेवेची प्रत्यक्ष पुरवठा न करता बनावट बिलांद्वारे ५३५.९८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले. त्यानुसार, डीजीजीआय गोवा विभागाने या प्रकरणात अटक केलेल्या टोळीचा म्होरका पुखराज किशना राम याच्या विरोधात म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ३८ साक्षीदारांची साक्ष नोंद केले आहे. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.