भारतीय क्रिकेटमध्ये धक्कादायक बदल करताना निवड समितीने रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवून शुभमन गिलकडे ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय क्रिकेटप्रेमींना रुचलेला नाही.
रोहित शर्माने कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटला मोठ्या उंचीवर नेले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ टी-२० वर्ल्डकप आणि २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या. त्याच्या नेतृत्वाखाली प्रत्येक खेळाडू मॅचविनर ठरत होता आणि संघाची ओळख एकसंध, योजनाबद्ध आणि प्रेरणादायी अशी बनली होती.
वर्ल्डकप जिंकणे कोणत्याही कर्णधारासाठी शिरपेचातील मानाचा तुरा असतो. अशा वेळी रोहितला पदावरून बाजूला करणे हे कितपत योग्य आहे. कर्णधार म्हणून त्याची आकडेवारी प्रभावी आहे. त्याने आपल्या फलंदाजी आणि आपल्या नेतृत्व कौशल्याच्या आधारे संघाला वारंवार सामन्यांमध्ये विजयी मार्ग दाखवला आहे.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी या निर्णयामागील काही कारणे स्पष्ट केली. त्यापैकी एक कारण म्हणजे, तीन स्वरूपात तीन वेगवेगळे कर्णधार असणे प्रशिक्षकासाठी गोंधळाचे ठरू शकते. परंतु तज्ज्ञांच्या मते, हेच जर खरे असेल, तर तिन्ही प्रकारांसाठी एकच कर्णधार नेमणे अधिक सोपे ठरले असते.
दुसरे कारण असे की, रोहित चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर फारसे आंतरराष्ट्रीय सामने खेळला नाही. एकदिवसीय क्रिकेटची संख्या कमी झाली आहे, मात्र हा दोष रोहितचा कसा असू शकतो? बीसीसीआयने वनडे स्पेशालिस्ट खेळाडूंना जास्त सामने खेळता यावेत, अशी संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते.
शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत ७०० हून अधिक धावा केल्या आणि २-२ अशी मालिका बरोबरीत सोडवली. त्याने फलंदाज आणि कर्णधार म्हणून आपली क्षमता सिद्ध केली. त्यामुळे निवड समितीने त्याच्याकडे एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. मात्र कसोटी क्रिकेटमधून एकदिवसीयपर्यंत नेतृत्वाचा विस्तार इतक्या लवकर करणे हा ‘धाडसी’ की ‘अतिउत्साही’ निर्णय आहे. रोहितने आपल्या नेतृत्वकौशल्याने भारतीय संघाला एकात्मतेची नवी व्याख्या दिली. २०२३ एकदिवसीय विश्वचषकात संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. २०२४ टी-२० वर्ल्डकपमध्ये फिरकीपटूंवर विश्वास दाखवणे, ऋषभ पंतला बढती देणे, अक्षर पटेलचा योग्य वापर करणे, मधल्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहला गोलंदाजीला आणणे या सगळ्या त्याच्या रणनीती संघाच्या विजयात निर्णायक ठरल्या. इम्रान खानने १९९२ मध्ये वयाच्या चाळीशीत संघाला विश्वविजेता बनवले होते. त्यामुळे रोहितला २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत कर्णधारपदी ठेवता आले असते.
- प्रवीण साठे