बायडननी दडपले भ्रष्टाचारविरोधी भूमिकेमागील सत्य

Story: विश्वरंग |
10th October, 08:08 pm
बायडननी दडपले भ्रष्टाचारविरोधी भूमिकेमागील सत्य

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन उपाध्यक्ष ज्यो बायडन यांनी डिसेंबर २०१५ मध्ये युक्रेन दौऱ्यावर दिलेले भ्रष्टाचारविरोधी भाषण आणि अमेरिकेच्या तत्कालीन भूमिकेमागे मोठे सत्य लपवले गेले होते, असा खळबळजनक खुलासा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थाच्या जुन्या फाईल्समधून झाला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत 'दोन मापदंड' असल्याचा आरोप केला होता, मात्र ही नाराजी अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून जाणीवपूर्वक वगळण्यात आली होती.

डिसेंबर २०१५ मध्ये ज्यो बायडन यांनी युक्रेनची राजधानी कीव येथे युक्रेनी संसदेत भाषण देत भ्रष्टाचाराला 'कॅन्सर' म्हटले होते आणि तो समूळ नष्ट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले होते. या भाषणानंतर युक्रेनचे अधिकारी प्रचंड नाराज झाले होते. त्यांची नाराजी या गोष्टीमुळे होती की, त्यावेळी बायडन यांचा मुलगा हंटर बायडन युक्रेनची ऊर्जा कंपनी बुरिज्मा होल्डिंग्समध्ये काम करत होता आणि त्याला वर्षाला सुमारे १ मिलियन डॉलर (सुमारे ८ कोटी रुपये) मानधन मिळत होते. जेव्हा अमेरिका अशा कौटुंबिक संबंधांकडे दुर्लक्ष करत आहे, तेव्हा इतरांना भ्रष्टाचारावर भाषण देण्याचा त्याला कोणताही हक्क नाही, अशी टीका युक्रेनी अधिकाऱ्यांनी खासगीत केली होती. सीआयएच्या उघड झालेल्या फाईल्सनुसार, युक्रेनच्या या नाराजीचा अहवाल तयार करण्यात आला होता. परंतु, तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कॉलिन काल्ह यांच्या विनंतीवरून तो अहवाल राष्ट्राध्यक्षांच्या 'दैनंदिन गुप्तचर ब्रीफ'मध्ये समाविष्ट करण्यात आला नाही. १० फेब्रुवारी २०१६ रोजी पाठवलेल्या सीआयए अधिकाऱ्याच्या ईमेलमध्ये स्पष्टपणे लिहिले होते की, काल्ह यांची इच्छा आहे की हा अहवाल प्रसारित केला जाऊ नये. हा ईमेल तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना रोज ब्रीफिंग देणारे अधिकारी मायकल डेम्पसी यांनी पाठवला होता.

राष्ट्राध्यक्षांच्या दैनंदिन गुप्तचर अहवालात जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या राजकीय आणि सुरक्षाविषयक माहितीचा समावेश असतो. युक्रेनची ही नाराजी रिपोर्टमधून वगळल्यामुळे, अमेरिकन प्रशासनाने त्यावेळी बायडन कुटुंबाशी संबंधित वाद लपवण्याचा प्रयत्न केला होता, हे स्पष्ट होते. बायडन आता माजी राष्ट्राध्यक्ष असले तरी, अमेरिकेच्या राजकारणात पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सध्या सुरू असलेल्या वादविवादामुळे हा जुना अहवाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

- सुदेश दळवी