काँग्रेस-आपचे मतभेद भाजपच्या फायद्याचे

काँग्रेस आणि आपच्या नेत्यांनी परस्परांवर टीका करण्याऐवजी गोव्यात मैत्री केली तर देशातही नंतर हा पॅटर्न फायदेशीर ठरू शकतो. या दोन्ही पक्षात जेवढी दरी निर्माण होईल, तेवढाच विरोधकांना विशेषतः भाजपला फायदा होईल.

Story: संपादकीय |
09th October, 12:31 am
काँग्रेस-आपचे मतभेद भाजपच्या फायद्याचे

विधानसभा निवडणूक एक वर्षावर येऊन ठेपलेली असताना गोव्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील मतभेद उफाळून आले आहेत. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील दौऱ्यात काँग्रेसलाच टीकेचे लक्ष्य केल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता धुसर आहे. केजरीवाल यांनी केलेली टीका कमी की काय, की त्यानंतर आपचे गोव्यातील नेते अमित पालेकर यांनीही काँग्रेसवर तोंडसुख घेतले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना लक्ष्य करत त्यांच्या व्यवसायावरही भाष्य केले. पाटकर यांनीही पालेकर यांचे जेनिटो कार्दोज या गुन्हेगाराशी असलेले व्यावसायिक संबंध दाखवत, व्यवसायाला राजकारणात आणणे कसे चुकीचे आहे, ते सांगण्याचा प्रयत्न केला. एका बाजूने गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स यांच्यासारखे दोन प्रादेशिक पक्ष ज्यांच्याकडे सध्या प्रत्येकी एक आमदार आहे, ते पक्ष एकत्र येण्याच्या प्रयत्नात असताना आम आदमी पार्टी ज्याचे दोन आमदार आणि काँग्रेसजवळ तीन आमदार असताना या दोन्ही पक्षांची तोंडे विरुद्ध दिशेला आहेत. याचा फायदा भाजपसारखा सध्याचा बलाढ्य पक्ष उठवू शकतो. भाजपच्या मदतीला मगोसारखा पक्ष आहेच. शिवाय अपक्ष निवडून आलेले आमदारही सध्यातरी भाजपसोबत आहेत. २०२७ च्या निवडणुकांचा विचार करून काँग्रेस, आप, आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड एकत्र आले तरच भाजपला तगडे आव्हान उभे करू शकतात. जर हे पक्ष आपापसात भांडत राहिले, तर २०२७ मध्येही भाजप पुन्हा बाजी मारू शकतो.

केजरीवाल गोव्यात आल्यानंतर त्यांनी दिल्लीत काँग्रेसने त्यांना केलेल्या नुकसानीचा बदला घेण्यासाठी काँग्रेसवर टीका सुरू केली. गोव्यात आपचा लढा काँग्रेसशी नसून तो भाजपशी आहे, एवढे जर आपला कळले तरच त्यांची धडगत आहे, अन्यथा आपची स्थिती २०२७ च्या निवडणुकीत वाईट होऊ शकते. आपचे दोन आमदार हे काँग्रेसच्या ताब्यात असेलल्या मतदारसंघांतून निवडून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसलाच दोष देत राहिल्यास, काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना आपल्या बाजूने ओढता येईल, असे कदाचित आपच्या नेत्यांना वाटत असावे. अन्यथा केजरीवालनंतर पालेकरनीही काँग्रेसला लक्ष्य केले नसते. भाजपच्या मतदारसंघात मुसंडी मारता येणार नाही, याची जाणीवही आपला झालेली असू शकते. त्यामुळे काही सुरक्षित मतदारसंघ हेरून तिथे आपले अस्तित्व दाखवण्यासाठी आपचा प्रयत्न असू शकतो. म्हणजे सत्तेत येण्यापेक्षा काँग्रेसला नुकसान करून अस्तित्व टिकवणे आपला महत्त्वाचे वाटू शकते. आप काँग्रेसच्या मदतीशिवाय गोव्यात सत्तेत येऊ शकत नाही, हे सत्य त्यांच्या नेत्यांनी स्वीकारावे लागेल. मागील दोन्ही निवडणुकांचा निकाल पाहिला तर निवडणुकीपूर्वी पक्षांतरामुळे कमजोर झालेली दिसत असलेली काँग्रेस पुन्हा निवडणुकीत दहापेक्षा जास्त जागा मिळवते. याचाच अर्थ काँग्रेसला अजूनही मतदार स्वीकारत आहेत. मागील दोन निकालांमधूनच आप, गोवा फॉरवर्ड, आरजीपी आणि काँग्रेसने शिकण्याची गरज आहे. चारही पक्ष एकत्र राहिले तरच भाजपला टक्कर दिली जाऊ शकते, अन्यथा या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवून सध्याच्या स्थितीत भाजपला पराभूत करण्याचा विचार करणे हे हास्यास्पद ठरू शकते.

केजरीवाल, पालेकर यांनी काँग्रेसपेक्षा भाजपला लक्ष्य केले असते तर त्याचा परिणाम जास्त प्रभावी झाला असता. पण आपच्या नेत्यांनी काँग्रेसलाच जास्त लक्ष्य केल्यामुळे आम आदमी पक्षाच्या हेतूबाबत जनतेतही संभ्रम आहे. काँग्रेसला हलक्यात घेण्याची चूक कोणीही करू नये. गोव्यातील राजकीय स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आपने वेळ द्यावा लागेल. कारण गोव्यात काँग्रेसला जेवढा विरोध त्यांच्याकडून होईल, तेवढा त्याचा फायदा सत्ताधारी भाजपला होईल. दिल्लीत काँग्रेसमुळे भाजपला सत्ता मिळाली म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी जर आपचे नेते गोव्यात तोच पॅटर्न वापरू पाहत असतील तर आपला त्याचा पश्चाताप नक्कीच होईल. काँग्रेस आणि आपच्या नेत्यांनी परस्परांवर टीका करण्याऐवजी गोव्यात मैत्री केली तर देशातही नंतर हा पॅटर्न फायदेशीर ठरू शकतो. या दोन्ही पक्षात जेवढी दरी निर्माण होईल, तेवढाच विरोधकांना विशेषतः भाजपला फायदा होईल. स्वबळावर निवडणूक लढवून आप गोव्यात सत्ता स्थापन करू शकत नाही, हे सत्य जेवढे लवकर स्वीकारले जाईल तेवढाच आपला त्याचा फायदा होईल.