गोव्यासाठी पर्यटकांवरील नाहक हल्ले घातक

Story: अंतरंग |
22 hours ago
गोव्यासाठी पर्यटकांवरील नाहक हल्ले घातक

पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पर्यटक, मग ते देशी असोत वा विदेशी, गोव्याचा आर्थिक डोलारा त्यांच्यामुळेच चालतो. मात्र, हल्ली शुल्लक कारणांवरून पर्यटकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत, ज्यामुळे गोव्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. शांत, सुसंस्कारी आणि प्रेमळ अशी गोव्याची जी ओळख होती, तिला आता हिंसक स्वरूप प्राप्त झाले आहे काय आणि गोवा हिंस्र वृत्तीचे राज्य म्हणून ओळखला जाऊ लागला आहे का, असा प्रश्न पडतो.

​अलीकडेच, टिटो-कळंगुट येथे अपघातानंतर ठाणे-मुंबईतील पर्यटकांवर जो प्रसंग ओढवला आणि दंगलीसारखे वातावरण निर्माण झाले, ते चिंतनीय आहे. निष्काळजीपणे किंवा चुकून घडलेला अपघात हा अपघातच असतो. पर्यटक किंवा परप्रांतियांकडून अपघात झाल्यास लगेच वाहनचालकांवर हल्ला करणे, त्यांना मारहाण करणे किंवा वाहनाची तोडफोड करणे हे निंदनीय आहे. ज्या पर्यटनावर आपला उदरनिर्वाह चालतो, त्याच पर्यटकांना शारीरिक व मानसिक त्रास देणे अयोग्य आहे.

​एखादा पर्यटक जर दंगामस्ती करत असेल किंवा इतरांना त्रास देत असेल, तर त्याला समजावून सांगायला किंवा पोलिसांच्या स्वाधीन करायला हरकत नाही. मात्र कायदा हातात घेणे, ही प्रवृत्ती समाजात बळावत चालली आहे. मूळ गोवेकर असोत किंवा स्थलांतरित, ही हिंसक वृत्ती पर्यटकांवरील हल्ल्यांना खतपाणी घालत आहे. अनेकदा कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरते, तेव्हा लोकप्रतिनिधींनी शांततेचे आवाहन करणे अपेक्षित असते, पण जेव्हा हेच लोक जनतेला भडकावण्याचे काम करतात, तेव्हा कळंगुटसारखे प्रश्न निर्माण होतात.

​गोव्यात येणारे पर्यटक मौजमस्तीसाठी येतात. पर्यटकांच्या गाडीत दारूच्या बाटल्या सापडणे यात गैर नाही. बाटल्या असणे म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणे असे होत नाही, मात्र पर्यटकांकडून घडणारे अपघात मद्य प्राशनामुळेच होतात, हा गोमंतकियांमध्ये निर्माण झालेला भ्रमच या हल्ल्यांमागील मुख्य कारण आहे.

​दोषींवर पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणा कारवाई करतीलच. त्यासाठी कायदा हातात घेण्याची गरज नाही. गोवेकरांकडून पर्यटकांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे गोव्याचे नाव बदनाम होऊन पर्यटन खालावत चालले आहे. सरकारने आणि गोमंतकियांनी याची दक्षता घ्यायला हवी, तरच गोवा पर्यटनासाठी सुरक्षित स्थळ राहील.


उमेश झर्मेकर