तुमचे ओजस वाढवणे

जेव्हा लोक त्यांच्या सभोवती योग्य प्रकारची ऊर्जा घेऊन जातात, जेव्हा त्यांचे ओजस असे असते की शंभर लोक त्यांच्या सावलीत त्याचा अनुभव घेऊ शकतात, फक्त तेव्हाच कल्याण साध्य होईल.

Story: विचारचक्र |
22 hours ago
तुमचे ओजस वाढवणे

सद्गुरू : मानवाच्या स्वभावातच एक असा भाग असतो, जो आत्मसंरक्षणाची प्रवृत्ती आहे - जो सतत सीमा ठरवतो आणि त्यांचे संरक्षण करतो. जर तुम्ही भौतिक स्वरूपाच्या नियमांप्रमाणे गेलात, तर स्वाभाविकपणे आत्मसंरक्षण हीच मुख्य प्रक्रिया आहे. जर ती चांगली चालली आहे, तर भौतिक अस्तित्वाची पुढची तत्काळ मागणी म्हणजे प्रजनन. पण ते देखील आत्मसंरक्षणच आहे - प्रजातीचे संरक्षण. भौतिकता फक्त एवढेच जाणते - आणि ते चांगले आहे. जर भौतिक गोष्टींना आत्मसंरक्षणाची कुठलीच जाणीव नसती, तर तुमचे अस्तित्वच नसते.

तथापि, मानवाचा आणखी एक पैलू आहे, जो नेहमी सध्या आहे त्यापेक्षा काहीतरी अधिक होण्याची इच्छा बाळगतो. तुम्ही कोण आहात, किती मोठे आहात किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही काय बनला आहात याला काही महत्व नाही, पण तरीही तुम्ही सध्या जे आहात त्यापेक्षा काहीतरी अधिक बनण्याची इच्छा बाळगता. म्हणजे तुमच्यात असे काहीतरी आहे, ज्याला सीमा आवडत नाहीत, जे सतत अमर्याद होण्याची इच्छा बाळगते - तुम्ही अनंताच शोध घेत आहात. ते अद्भुत आहे, पण समस्या अशी आहे की, तुम्ही ते टप्प्याटप्प्यात शोधत आहात. जर तुम्ही टप्प्याटप्प्याने गेलात, तर तुम्ही संपूर्ण आयुष्य घालवाल आणि तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही अजूनही समाधानी नाही. तुम्ही १ २ ३ ४ ५ मोजून कधीही अनंतापर्यंत पोहोचू शकत नाही; तुम्ही फक्त अंतहीन मोजणी करत बसाल. योग्य साधन वापरल्याशिवाय, तुम्ही तिथे पोहोचणार नाही.

"बंधन ते अमर्याद" या दिशेने जाण्यासाठी, तुमच्याकडे सध्या कोणतेही वाहन नाही, कारण तुमच्याकडे जे आहे ते सर्व भौतिक आहे. आणि सीमाच भौतिकतेची व्याख्या ठरवते. जर तुम्ही काहीतरी अमर्याद शोधत आहात, तर ते अभौतिक असावे लागेल. तुम्हाला स्वतःसाठी एक वाहन निर्माण करावे लागेल जे अभौतिक आहे, पण तरी सुद्धा त्याचे स्वतःचे एक ठराविक स्वरूप आहे. ओजस हा तो आयाम आहे, जिथे तुम्ही अभौतिक ऊर्जा निर्माण करता, पण तरीही तिचे स्वरूप वैयक्तिक आहे. ते वाहन म्हणून वापरले जाते.

जर तुम्ही तुमच्या सभोवती पुरेसे ओजस निर्माण केले, तर या अस्तित्वातला तुमचा प्रवास सुरळीत होईल. तुम्ही पहाल की, जीवन तुमच्यासाठी सहजतेने घडत आहे. तुम्ही कुठेही गेलात तरी, सहजतेने पुढे जाता. कदाचित तुमच्या आसपास बराच गोंधळ चालू असेल, पण कसातरी तुमचा मार्ग नेहमी मोकळा होतो, आणि तुम्ही पुढे जात राहता. तुम्ही अशा प्रकारे जगू शकता की, इतर लोकांना वाटेल की तुम्ही अतिमानव आहात, ते फक्त यामुळे की तुमच्या सभोवती ओजस आहे. सुदूर पूर्वेकडच्या संस्कृतींमध्ये, ज्ञानी व्यक्तीला "एन्सो" म्हणतात. एन्सो म्हणजे वर्तुळ. वर्तुळ हा सर्वात कमी प्रतिकाराचा आकार आहे. जर तुम्ही तुमच्या सभोवती पुरेसे ओजस निर्माण केले, तर तुम्ही तुमच्या अस्तित्वाने गोलाकार बनता, जेणेकरून या अस्तित्वातील तुमचा प्रवास सर्वात कमी प्रतिकारासह होतो.

ध्यानी ही अशी व्यक्ती आहे जिने ओजसचा उद्योग स्थापित केला आहे. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा साधारणपणे मानवासाठी बहुतेक अन्न हे भौतिक शरीरात रूपांतरित होते. त्याचा एक छोटा भाग ओजस बनतो. जेव्हा तुम्ही तुमची क्रिया करता, तेव्हा आम्ही हे प्रमाण बदलण्याचा प्रयत्न करतो - आपल्याला अन्नाचा मोठा भाग ओजसमध्ये रूपांतरित करायचा आहे. क्रिया योगाची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे या "कारखान्याला", जो अन्नाला मांस आणि विष्ठेत बदलतो, त्याच अन्नाला अधिक सूक्ष्म शक्यतेत बदलणारा कारखाना बनवणे, जो तुम्हाला दैवत्वापर्यंत पोहोचण्यायोग्य बनवतो.

जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे खूप मोठे ओजस असते, तेव्हा जे काही स्वर्गीय आणि दैवी मानले जाते ते सामान्य संवादासारखे घडून येते. तुम्ही अगदी सहजपणे गोष्टी पाहता आणि जाणून घेता, कारण तुमच्या ऊर्जा तितक्या सूक्ष्म झाल्या आहेत. असे का आहे की, एखाद्याची उपस्थिती इतकी भारदस्त आणि रूपांतरित करणारी दिसते, तर दुसऱ्याची कमकुवत दिसते, हे फक्त त्यांच्यासोबत असलेल्या ओजसच्या गुणवत्तेमुळे, तीव्रतेमुळे आणि प्रमाणामुळे आहे.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोक करू शकतात ज्यामुळे ओजसची वाढ विखुरते आणि नष्ट होते. अयोग्य वृत्ती, नकारात्मक विचार आणि भावना, आणि विविध प्रकारच्या मानसिक क्रिया यामुळे ते घडू शकते. विशिष्ट प्रकारच्या शारीरिक क्रिया, अति प्रमाणात लैंगिकता, अन्न भोग, उत्तेजकांचा जास्त वापर आणि दूषित वातावरणात राहिल्याने सुद्धा असे होऊ शकते. क्रिया आणि आध्यात्मिक साधनांनी तुम्ही टाकी भरता, पण मग जर ती तुमच्याकडून गळत राहिली, तर एखाद्या व्यक्तीला ओजस निर्माण करायला खूप वेळ लागतो. जर तुम्हाला सर्व छिद्रे कशी बंद करावी हे माहीत असेल, तर अचानक तुम्ही पहाल की तुम्ही तुमच्या सभोवती जी ऊर्जा गोळा करता ती प्रचंड आहे.

अध्यात्म म्हणजे अशा प्रक्रियांमध्ये जाणे, ज्या एखाद्याचे ओजस वाढवू शकतात आणि तुमच्या जीवनाची मूलभूत तत्त्वे बदलू शकतात - तुम्हाला स्वतःच्या आतील एका पूर्णपणे वेगळ्या अनुभवाकडे आणि आनंदाकडे नेतात, असा आनंद जो फक्त तुमचा नाही, तर तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकाचा असेल. तुमचे ध्यान फक्त तुमच्याबद्दल नाही. जर पंचवीस लोक खरोखर ध्यानमय बनले, तर नकळतपणे संपूर्ण शहर शांत होईल. स्वतःसोबत काय घडत आहे याची कुठलीही माहिती न होता, एक विशिष्ट स्थिरतेची जाणीव तयार होईल. एखादा जितका खोलवर जातो, तितका तो प्रत्येकाच्या कल्याणासाठी एक साधन बनतो.

चांगल्या गोष्टींबद्दल बडबड करण्याने खरी शांती आणि कल्याण साधणार नाही. जेव्हा लोक त्यांच्या सभोवती योग्य प्रकारची ऊर्जा घेऊन जातात, जेव्हा त्यांचे ओजस असे असते की शंभर लोक त्यांच्या सावलीत बसून त्याचा अनुभव घेऊ शकतात, फक्त तेव्हाच खरोखर कल्याण साध्य होईल.


(ईशा फाऊंडेशन)