म्हापशात मंगळवारी पहाटे एका डॉक्टरच्या घरावर पडलेला सशस्त्र दरोडा केवळ म्हापशात नव्हे, तर संपूर्ण राज्यातील जनतेच्या छातीत धडकी भरवणारा आहे. पहाटेच्या वेळी दरोडेखोर येतात काय, सुरीचा धाक दाखवून कपाटाच्या चाव्या घेतात काय, मोबाईल हिसकावून घेतात काय आणि ३५ लाखांचा ऐवज लुटतात काय - एखाद्या चित्रपटात शोभेल असेच हे कथानक आहे. गोवा हा पूर्वीसारखा शांत व सुरक्षित राहिलेला नाही, हे सिद्ध करणारा हा दरोडा आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे आणि तपासासाठी आधुनिक यंत्रणा असतानाही दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरोड्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. धमकी देऊन ३५ लाखांचा ऐवज लुटला जाणे, हे एक मोठे संकट आहे.
दरोड्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर पोलिसांना शाबासकी मिळाली असती. मात्र, दुर्दैवाने तपासात फारशी प्रगती झालेली नाही. राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी या दरोड्याचा लवकरात लवकर छडा लावणे पोलिसांसाठी अगत्याचे आहे.
कायदा-सुव्यवस्था राखणे ही पोलिसांचीच जबाबदारी असते. मात्र, आपले घर, तसेच रोकड वा मालमत्तेचा सांभाळ करणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी असते. या दरोड्यानंतर पोलिसांनीच नाही, तर नागरिकांनीही सतर्क राहण्याचा बोध घ्यायला हवा. नागरिकांच्या सुरक्षेसाठी व चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनीही व्यूहरचना आखायला हवी.
आजचे युग हे डिजिटल युग आहे. पैशांचे व्यवहार ऑनलाइन होतात. पेट्रोल पंप, मोठी दुकाने, इस्पितळे यांमध्ये सर्वत्र पेटीएम वा जी-पेच्या आधारे पैशांचे व्यवहार चालतात. यामुळे घरात लाखो रुपयांची रोकड ठेवण्याची आवश्यकता नसते. तरीही बरेच जण लाखो रुपयांच्या नोटा वा रोकड घरात ठेवतात. हे धोकादायक ठरू शकते. आज बँकांमध्ये मशीनच्या आधारे रोख रक्कम जमा करण्याची सोय असते, त्याचा अवलंब व्हायला हवा.
एखादी अनोळखी व्यक्ती फिरताना दिसली, तर शेजाऱ्यांसह इतरांनी पोलिसांना त्याची माहिती द्यायला हवी. बसस्थानके, बाजारपेठा, इस्पितळे वा गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांनी विशेष लक्ष द्यायला हवे. तक्रार करण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष असला तरी बऱ्याचदा फोन उचलला जात नाही, अशा तक्रारी आहेत. पोलीस नियंत्रण कक्ष अधिक कार्यक्षम असायला हवा. जनतेचा जो थोडाफार पोलिसांवर विश्वास आहे, तो टिकवून ठेवण्यासाठी दरोडेखोरांपर्यंत पोलिसांना पोचावेच लागेल.