गोव्यातील गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने गुप्तचर यंत्रणा सक्रिय आणि मजबूत केली, तर बरेच प्रश्न सुटू शकतात. सीसीटीव्हीचे जाळे, पकडलेल्या गुन्हेगारांचा बायोमेट्रिक तपशील जमवणे, फिंगरप्रिंट सारख्या गोष्टी जमवणे हे पोलिसांनी करण्याची गरज आहे.
दोनापावला येथे एका उद्योजकाच्या घरावर पडलेल्या दरोड्याला पाच महिने झाले, परंतु दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरोडेखोर विदेशात पळाले असण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागलेले नाहीत. त्या ठिकाणीही वृद्धांना बांधून घर लुटण्यात आले. अशाच दरोड्याची पुनरावृत्ती म्हापशात झाली. म्हापशातील गणेशपुरी परिसरातील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या घरावर रात्री दरोडा पडला. मंगळवारी पहाटे ३ ते ५ वाजेपर्यंत दरोडेखोर डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यात होते. दोन तास दरोडेखोरांनी पैसे आणि दागिन्यांसाठी सगळे घर धुंडाळले. तोडफोड केली. वृद्ध महिलेला बांधून शेवटी तिने संभाळून ठेवलेले पैसेही घेऊन चोर पसार झाले. घराबाहेर असलेली एक कार घेऊन चोरांनी पणजी गाठली आणि तेथून ते पसार झाले. गजबजलेल्या परिसरात पहाटेचा दरोडा पडतो, हेच मुळात धक्कादायक आहे. दोनापावला आणि म्हापशातील दरोड्यात बरेच साम्य असले तरी दोन्ही टोळ्या वेगवेगळ्या असू शकतात. पोलिसांना दोन्ही प्रकरणात अद्याप काही सापडलेले नाही. विशेष म्हणजे, गोव्यातील वीसेक गुंड सध्या कोलवाळच्या तुरुंगात आहेत. त्यामुळे गोव्यातील या टोळ्या असण्याची शक्यताही कमी आहे. पण दोन्ही चोऱ्यांमध्ये सापडलेला ऐवज त्यांनी गोव्याबाहेर नेला असावा, याचीही शक्यता कमी आहे. पोलिसांना कधी या दोन्ही दरोड्याचा तपास लागला तर सत्य बाहेर येईलच, पण गोव्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून चोर, गुंड, दरोडेखोर आता पोलिसांना आव्हान देत आहेत हे नाकारता येणार नाही. पुन्हा पुन्हा मोठे गुन्हे गोव्यात घडत असताना, ते रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा अपयशी का होत आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. त्याचे उत्तर द्यायचे असेल तर पोलिसांनी या गुन्ह्यांचा छडा लावताना असे गुन्हे गोव्यात घडू नयेत, याची खबरदारी घ्यावी लागेल.
मुंगूल येथे झालेले टोळी युद्ध, दोनापावला येथे मोठ्या उद्योजकाच्या घरावर पडलेला दरोडा, रामा काणकोणकर यांना गुंडाकडून झालेली मारहाण, गणेशपुरी-म्हापसा येथे डॉ. घाणेकर यांच्या घरावर पडलेला दरोडा या सगळ्या घटनांमुळे पोलिसांनी जास्त सावधान व्हायला हवे. अनेक घरफोड्या, चोऱ्या होत आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांत काही दरोडे, टोळी युद्ध आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडले, हे सुरक्षेच्या दृष्टीने अधिक गंभीर आहे. पोलिसांनी भाडेकरूंची पडताळणी मोहीम घेतली आणि रात्रीची गस्त वाढवली तरीही होणाऱ्या घटना पोलीस रोखू शकलेले नाहीत.
गोव्यात कुख्यात गुंड येऊन राहतात. बिश्नोई गँगच्या सदस्यांनाही गोव्यातून अटक झाली आहे. गोव्यातील ड्रग्ज व्यवहाराचे सिंडिकेट मुंबई, हैदराबादपर्यंत पसरलेले आहे. गुन्हेगारीचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी पोलिसांना नेहमीच यश आलेले नाही. त्यामुळेच गोव्यात गुंड, दरोडेखोरांच्या टोळ्याही सक्रिय होतात आणि दरोडेही पडतात. गोव्यातून चोरीला गेलेले मंगळसूत्र पुण्यातून परत आणण्यात पोलिसांना यश येते, पण दरोड्यात चोरीला गेलेला मालही परत येत नाही आणि दरोडेखोरही पोलिसांच्या हाती लागत नाहीत. अशा कितीतरी घरफोड्यांचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही. काही गुन्ह्यांमध्ये पोलीस संशयितांना पकडतात. प्रकरणे लवकर सोडवतात. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेत तपासातील त्रुटी आणि पुराव्यांअभावी गुन्हेगार मोकाट सुटतात. खून, लैंगिक छळ, मारहाण, खुनाचा प्रयत्न अशा अनेक प्रकरणांमधून संशयित आरोपी सध्या निर्दोष सुटत आहेत. पोलीस काही गंभीर प्रकरणांचा तपास लावू शकलेले नसले तरी इतर घटनांचा तपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त लावला आहे. पण दुसऱ्या बाजूने पकडलेले संशयित आरोपी निर्दोष मुक्त होतात, हेही तितकेच चिंताजनक आहे. पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळेच गोवा पोलिसांनी आपली प्रतिमा सुधारण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. समाज सुरक्षित आहे हे दाखवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. सध्या ऑनलाईन तसेच वित्तीय फसवणुकीचे प्रकार गोव्यात रोज घडत आहेत. असे प्रकार थांबत नाहीत. पोलिसांनी ते रोखण्यासाठी मोहीम उघडणे आवश्यक आहे. गोव्यातील गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने गुप्तचर यंत्रणा सक्रिय आणि मजबूत केली, तर बरेच प्रश्न सुटू शकतात. सीसीटीव्हीचे जाळे, पकडलेल्या गुन्हेगारांचा बायोमेट्रिक तपशील जमवणे, फिंगरप्रिंट सारख्या गोष्टी जमवणे हे पोलिसांनी करण्याची गरज आहे.