आठ महिन्यांतील सर्वांत कमी दर : राष्ट्रीय महागाई दरात किंचित वाढ
पणजी : सप्टेंबर महिन्यात गोव्यातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर कमी होऊन ३.८७ टक्के झाला. मागील आठ महिन्यांत हा सर्वात कमी महागाई दर होता. मात्र, संपूर्ण देशात महागाई दर अधिक असण्यात गोवा तिसऱ्या स्थानी राहिला. सप्टेंबरमध्ये देशातील महागाई दर १.५४ टक्के राहिला. हा जून २०१७ नंतरचा सर्वात कमी महागाई दर ठरला. देशभरात भाज्या, तेल, फळे, अंडी, डाळी आदींच्या किमतीत किरकोळ वाढ झाली. यामुळे राष्ट्रीय महागाई दरात किंचित वाढ झाली.
केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार, गोव्यात ऑगस्टमध्ये महागाई दर ३.८९ टक्के, जुलैमध्ये ६.३४ टक्के, जूनमध्ये ६.३४ टक्के, मे मध्ये ६.८२ टक्के, तर एप्रिलमध्ये ६.९५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. देशाचा विचार करता सप्टेंबर महिन्यातील अन्नधान्य महागाई दर हा १ टक्क्यांपेक्षा कमी झाला. अन्नधान्य महागाई दर सलग चौथ्या महिन्यात १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. सलग आठव्या महिन्यात देशाचा किरकोळ महागाई दर रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या ४ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
केरळमध्ये सर्वाधिक, मणिपूरमध्ये सर्वांत कमी दर
सप्टेंबर महिन्यात केरळमध्ये सर्वाधिक ९.०५ टक्के महागाई दर होता, त्यानंतर जम्मू आणि काश्मीर (४.३८ टक्के) आणि गोवा (३.८७ टक्के) यांचा क्रमांक लागतो. याउलट, मणिपूरमध्ये महागाई दर सर्वात कमी म्हणजेच उणे १.०१ टक्के नोंदवला गेला. यानंतर उत्तर प्रदेश (-०.६१ टक्के), आसाम (-०.५६ टक्के) आणि बिहार (-०.५१ टक्के), तेलंगणा (-०.१५ टक्के), ओडिशा (०.२ टक्के), मध्य प्रदेश (०.१५ टक्के), राजस्थान (०.३१ टक्के), गुजरात (०.५३ टक्के), छत्तीसगढ (०.६४ टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो.