दिवाळीच्या तोंडावर समस्येमुळे ग्राहक त्रस्त
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ४ ऑगस्टपासून पणजीतील इंडियन बँकेतून धनादेश वटलेला नाही. कुणाच्याच खात्यात धनादेश जमा झालेला नाही. यामुळे बँक ग्राहक त्रस्त झाले आहेत. ‘सिस्टम डाऊन आहे किंवा अपडेशन सुरू आहे’, असे ग्राहकांना सांगण्यात येते. दिवाळीच्या तोंडावर बँकेतील धनादेशाचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
रिझर्व्ह बँकेने नव्याने सुरू केलेल्या प्रणालीत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सिस्टीमद्वारे इन्स्टंट चेक क्लिअरिंग्स, म्हणजे दोन तासांत कुठल्याही बँकेचे चेक क्लियर होणार आहेत. असे असले तरी ही सिस्टीम पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेली नाही. पूर्वी राज्यातील बँका पश्चिम विभागात यायच्या. पूर्वी धनादेश वाटवण्यापूर्वी स्कॅन करून मुंबईतील विभागीय कार्यालयात पाठवले जात होते. आता सर्व बँकांचे धनादेेश दिल्लीत सेंटर क्लिअरिंगसाठी जात असल्याने विलंब होत आहे.
अनेकांकडून धनादेश स्वीकारणे बंद
बँकेत दिलेला चेक क्लियर होतो की रिटर्न होतो, हेच कळत नाही. पणजीतील काही मोठ्या इलेक्ट्रॉनिक दुकानांनी धनादेशाद्वारे पेमेंट मिळण्यास अडचण येत असल्याने ग्राहकांकडून चेक स्वीकारणे बंद केले आहे. रोख किंवा डिजिटल पेमेंट करण्यास ते सांगितले आहे. अनेक ग्राहक आणि कंपन्या आता एनईएफटी आणि यूपीआयसारख्या ऑनलाईन व्यवहाराकडे वळले आहेत.