बांगलादेश सीमेवरून पोलिसांचा माहिती मिळवण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकून पसार झालेली दरोडेखोरांची टोळी बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेघालय पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ही टोळी भारताची सीमा ओलांडून बांगलादेशात पसार झाली आहे.
दरोडेखोरांची टोळी गोवा, कर्नाटक, हैदराबाद, पश्चिम बंगाल ते मेघालय अशा पाच प्रमुख राज्यांची सीमा ओलांडून, पोलीस यंत्रणांना चकवा देत बांगलादेशात पोहोचल्याने आता या दरोडेखोरांना भारतात आणणे आणि दरोडा प्रकरणाचा छडा लावणे, हे मोठे आव्हान गोवा पोलिसांसमोर आहे. सध्यातरी या दरोडा प्रकरणातील मुख्य दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याची आशा धुसर दिसत आहे. दरम्यान, गुन्हा शाखेची काही पोलीस पथके सध्या पश्चिम बंगाल व मेघालय या राज्यांत दरोडेखोरांची माहिती मिळवण्यासाठी तेथेच तळ ठोकून आहेत. उर्वरित पोलीस पथके गोव्यात परतली आहेत.
७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास सात जणांच्या सशस्त्र टोळीने डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावर दरोडा टाकला होता. घरातून रोख रक्कम, सुवर्णालंकार आणि इतर मौल्यवान वस्तू मिळून ३५ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांनी विविध पथके नियुक्त करून शेजारील राज्यांत पाठवली होती. परंतु दरोडेखोरांच्या मुसक्या आवळणे गोवा पोलिसांना शक्य झाले नाही. पोलीस यंत्रणांची भक्कम पोलादी चौकट भेदून दरोडेखोरांनी देशाची सीमा ओलांडल्याने त्यांना गजाआड करणे सध्यातरी अशक्य वाटत आहे.
दरम्यान, चौकशीवेळी गोवा पोलिसांच्या पथकांनी पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यांनी दरोडेखोरांना मदत केली होती. याच संशयितांनी दरोडेखोरांना पळून जाण्यास आवश्यक रसद पुरवली होती. पोलिसांकडून या संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. संशयित टोळीच्या बांगलादेशातील ठावठिकाणाची ठोस माहिती मिळालेली नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
दरोडेखोरांनी ओलांडली पाच राज्यांची सीमा
दरोडा प्रकरणाचा पोलिसांना सुगावा लागण्यापूर्वी दरोडेखोरांची टोळी गोव्याची सीमा पार करून कर्नाटकमध्ये दाखल झाली होती. कर्नाटक, हैदराबाद, पश्चिम बंगाल आणि मेघालय अशा पाच राज्यांची सीमा ओलांडून ही टोळी बांगलादेशमध्ये पसार झाली आहे.