खासदार विरियातो फर्नांडिस : प्रुडंट वाहिनीवरील ‘हेड ऑन’मध्ये मत व्यक्त
‘हेड ऑन’ कार्यक्रमात बोलताना खासदार विरियातो फर्नांडिस.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यात भाजपला आस्मान दाखवण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी होण्याची गरज आहे. विरोधी पक्षांची आघाडी झालेली गोमंतकीयांना हवी आहे. गोव्याच्या हितासाठी भाजपविरोधातील सर्व पक्षांनी एक होऊन लढले पाहिजे, असे मत काँग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी व्यक्त केले.
प्रुडंट मीडियाच्या ‘हेड ऑन’ कार्यक्रमात ते बोलत होते. प्रुडंट मीडियाचे संपादक संचालक प्रमोद आचार्य यांनी त्यांची मुलाखत घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात गोव्यात तरी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्याचाच परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला. भविष्यातही विरोधी पक्षांनी एकजूट कायम ठेवल्यास सर्वांच्याच हिताचे ठरेल. ‘आप’च्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही आघाडी हवी आहे. गोव्याच्या हितासाठी संघटित राहण्याची गरज आहे. ‘आप’च्या नेत्यांनी काँग्रेसवर जाहीर टीका केल्यामुळे काही नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. हा ‘आप’ला खरे तर वेगळा संदेश आहे, असे खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले.
दक्षिण गोव्यात काँग्रेसची मोठी ताकत आहे. उत्तर गोव्यातही पक्षाची ताकद वाढत आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी मी इच्छुक नाही. मी गोमंतकीयांच्या हितासाठी कार्यरत राहीन. जे आमदार काँग्रेस सोडून गेले, त्यांची नीतीमत्ता आणि चारित्र्य तपासण्याची गरज आहे. विजयी झाल्यानंतर अन्य पक्षात जाण्यापेक्षा पराभव परवडतो, असेही खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले.
बाणावली, वेळ्ळीत काँग्रेसची ताकत
बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेसने ‘आप’ला पाठिंबा दर्शवला होता. दबाव असूनही काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिला नाही. बाणावली तसेच वेळ्ळी मतदारसंघांत काँग्रेसची ताकत आहे. वेळ्ळी मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त १६९ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. सध्याच्या स्थितीत वेळ्ळी आणि बाणावली मतदारसंघांत विजय मिळवण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे.
काँग्रेसने ‘आप’वर टीका करणे टाळले
‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात येऊन काँग्रेसच्या नेत्यांवर विखारी टीका केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यावर त्यांनी आरोप केले. त्यामुळे ‘आप’विषयी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा निर्माण झाला. ‘आप’ने टीका केली तरी काँग्रेसने ‘आप’च्या नेत्यांवर टीका करणे टाळले. काँग्रेसने युतीचा धर्म पाळला आहे, असेही खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले.