पी. चिदंबरम यांनी केलेले वक्तव्य म्हणजे काँग्रेसला अजून संकटाच्या खोल गर्तेत ढकलून देणारेच आहे, असे म्हणता येईल. भाजपने काँग्रेसवर त्याआधारे निशाणा साधणे हे अपेक्षितच होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी अलीकडेच अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब फुटले जाणार, अशी इशारावजा धमकीच केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला दिली होती. त्यांचे हे बॉम्ब फुटले की उत्तर भारतात धो धो कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे फुसके ठरले, हे कळायला मार्ग नाही. पण काँग्रेसचेच आणखीन एक ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मात्र ऐन दिवाळीत एकामागून एक असे
'बॉम्ब ' फोडण्याचा सपाटा लावलाय की पुरती काँग्रेसच त्या बॉम्ब्सच्या स्फोटात उद्ध्वस्त तर होणार नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांसाठी आजच्या गोंधळाच्या राजकीय परिस्थितीत अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बिहार राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच पी. चिदंबरम यांनी भाजपच्या हातात अशी काही शस्त्रे सोपवली आहेत की, त्याचा वापर कसा आणि कधी करावा हे सांगण्यासाठी त्यांना कोणाच्याच सल्ल्याची गरज नाही. १९८४ मध्ये ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ या नावाखाली करण्यात आलेली कारवाई म्हणजे एक मोठे पाऊल होते आणि ती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मोठी चूक होती, असे वक्तव्य करून पी. चिदंबरम यांनी आणखीन एक असा बॉम्ब फोडला आहे की त्याचे चटके काँग्रेसला आता बराच काळ सहन करावे लागतील. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यासाठीच आपला जीव गमवावा लागला, अशी पुस्ती जोडण्यासही पी. चिदंबरम विसरले नाहीत आणि त्यातून होणाऱ्या परिणामांचाही विचार त्यांनी केलेला दिसत नाही.
पी. चिदंबरम हे काही साधेसुधे व्यक्तिमत्त्व नाही की, ज्यांच्या वक्तव्याकडे देशाने दुर्लक्ष करावे. केंद्रात गृहमंत्री तसेच अर्थमंत्री यासारख्या पदांची जबाबदारी एकेकाळी सांभाळणाऱ्या पी. चिदंबरम यांनी एकापाठोपाठ एक अशी दोन वक्तव्ये करून आपल्या पक्षाला एवढे अडचणीत आणले आहे की, त्यातून बाहेर पडताना पक्षाची बरीच दमछाक होऊ शकेल आणि त्याची जबर किंमतही कदाचित मोजावी लागेल. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' कारवाईबाबत केलेल्या विधानाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हौतात्म्यावर सवाल उपस्थित करण्याची संधी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसह अनेकाना दिली आणि ही संधी गमावण्याइतपत भाजपचे आजचे नेतृत्व अजिबात खुळे नाही, हे लगेच दिसून आले. पी. चिदंबरम यांनी अलीकडेच असेच आणखीन एक वक्तव्य केले होते की, ज्यामध्ये त्यांनी मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यापासून आम्हाला त्यावेळेस परकी शक्तींनी कसे रोखले, याचा जणू त्यांनी कबुलीजबाब दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर त्या विधानाचा बिहार निवडणूक प्रचारात वापर करताना कसे राजकीय भांडवल केले हे देशाने पाहिलेच आहे. अशा परिस्थितीत पी. चिदंबरम साहेबांनी आपल्याच छोटेखानी तंबूत आणखीन एक स्फोट घडवून आणला आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षात खळबळ आणि वादंग माजला नसता, तरच ते नवल ठरले असते. स्वपक्षाचीच कोंडी या विधानाने चिदंबरम यांनी केली असून पक्षात सध्या जे काही नेतृत्व उरले आहे त्यांनी तर त्यावर स्पष्ट नाराजी व्यक्त करत कपाळाला हात लावला आहे.
इंदिरा गांधी यांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी १९७५ मध्ये देशावर लादलेल्या आणीबाणीचा विसर आजही लोकांना पडलेला नसताना वा काँग्रेसला त्यांचा भूतकाळ दाखवून देण्यात सत्तारूढ पक्षाचे नेते आजही कोणतीच संधी गमावण्याच्या मूडमध्ये नसताना, पी. चिदंबरम यांनी केलेले वक्तव्य म्हणजे काँग्रेसला अजून संकटाच्या खोल गर्तेत ढकलून देणारेच आहे असे म्हणता येईल. भाजपने काँग्रेसवर त्याआधारे निशाणा साधणे हे अपेक्षितच होते. पी. चिदंबरम खरे तेच बोलले आहेत, त्यांच्यावर आता कारवाई करणार आहात का, असा सवाल करत त्यांनी काँग्रेसला डिवचले आहे. काँग्रेस पक्षाने देशावर राज्य करताना केलेल्या घोडचुका चिदंबरम सारखे नेते विलंबाने का होईना मान्य करत आहेत आणि देशासमोर त्या येत आहेत, अशा सुरातच भाजप सध्या काँग्रेसला पछाडत आहे आणि त्यास उत्तर देण्याचे नैतिक धैर्य आज काँग्रेस पक्षाकडे नाही, ही मान्य करावेच लागेल. ऑपरेशन ब्ल्यू स्टार या नावाखाली दहशतवाद्यांविरुद्ध केलेली कारवाई राष्ट्रीय अनिवार्यता नव्हती तर ती मोहीम म्हणजे राजकीय दु:साहस होते आणि हे ऑपरेशन टाळता येणे शक्य होते, हे पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यातून सूचित होते अशाच शब्दात भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसचा जो समाचार घेतला आहे, तो योग्यच वाटतो.
त्यावेळच्या परिस्थितीत ऑपरेशन ब्ल्यू स्टार आवश्यक होते, पण त्याची अंमलबजावणी करण्याची पद्धत चुकली आणि इंदिरा गांधी यांच्यासाठी ती घातक ठरली व त्यांना आपला जीव गमवावा लागला हे सांगताना पी. चिदंबरम यांनी थोडासा बुद्धीला ताण दिला असता तर इंदिरा गांधी यांच्या 'हौतात्म्या'वर आपणच सवाल उपस्थित करत आहोत, हे त्यांना कळून आले असते.
काँग्रेससाठी ही फार मोठी पिछेहाट ठरू शकेल, यात संदेह नाही आणि बिहारच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या हाती परिणामकारक असे हे अस्त्र लागल्याने त्याचा वापर त्यांच्याकडून मुक्तपणे होईल, यात संदेह बाळगण्याचे कारण नाही. शिखांचे अतिशय पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या सुवर्णमंदिरातून जर्नैलसिंग भिंद्रनवालेसह अन्य दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी १ ते १० जून १९८४ दरम्यान 'ऑपरेशन ब्लू स्टार' ही लष्करी कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतरच पंजाबमध्ये हिंसाचाराचे पुढील पर्व सुरू झाले, हा इतिहास तसा अजूनही देशवासीयांच्या स्मृतीपटलावर कोरला गेलेला आहे. या कारवाईने भारतीय राजकारण, समाज, धर्म आणि राष्ट्रीय एकतेवर दीर्घकालीन परिणाम केले हेही स्पष्ट आहे. सुवर्णमंदिर पुन्हा मिळवण्यासाठी ही कारवाई करणे योग्य मार्ग नव्हताच याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही, पण पी. चिदंबरम यांनी अशा वेळी हा मुद्दा उपस्थित केला आहे की त्यांच्याच पक्षाला त्याची जबर राजकीय किंमत मोजावी लागेल असे दिसते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची विधाने खुद्द काँग्रेस पक्षातच कोणी गांभीर्याने घेताना दिसत नाही आणि आता पी. चिदंबरम यांनी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेणारी विधाने सवंग प्रसिद्धीसाठी करावीत, याचे सर्वांना आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. काँग्रेसमध्ये त्यावरून वादंग निर्माण होणे अपेक्षितच होते, पण धनुष्यातून बाण सुटलेला आहे. पुढील काही दिवसात त्याचे बरेच राजकीय चर्वितचर्वणही होईल. काँग्रेस त्यास कसे उत्तर देईल हे पाहण्यासारखे असले तरी तोपर्यंत त्या पक्षात 'चिदंबरा चिदंबरा' हाच सूर आळवला जाणार आहे. काँग्रेस पक्षाचा 'हात' आणि पायही अधिकच खोलात जाण्याचेच हे स्पष्ट संकेत आहेत.
वामन प्रभू
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९