मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्जांचे वितरण : मये, डिचोली, थिवी, हळदोणा, म्हापसा येथे कार्यक्रम
नास्नोळा येथील कार्यक्रमात अर्जाचे वितरण करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार कार्लुस फेरेरा व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ‘माझे घर’ योजनेचा लाभ मतदारसंघांतील लोकांना मिळवून देण्यासाठी सत्ताधारी भाजप आमदारांसह विरोधी आमदारही पुढे सरसावले आहेत. सोमवारी मये, डिचोली, थिवी, हळदोणा आणि म्हापसा मतदारसंघांत अर्ज वितरणाचा कार्यक्रम झाला. हळदोणा मतदारसंघातील कार्यक्रम नास्नोळा येथे झाला. यावेळी काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा उपस्थित होते. सर्व कार्यक्रमांना स्थानिक आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारी, कोमुनिदाद आणि खासगी जमिनीतील अनधिकृत घरे अधिकृत करण्यासाठी गोवा सरकारने ‘माझे घर’ योजना कार्यान्वित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर रोजी या योजनेचा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये थाटात शुभारंभ झाला होता. त्यानंतर सोमारपासून योजनेचे अर्ज वितरण करण्याला प्रारंभ झाला. अर्ज ऑनलाईन उपलब्ध आहेत, तसेच अर्जाच्या छापील प्रती पंचायती, पालिका, मामलेदार कार्यालयांत उपलब्ध आहेत.
डिचोली येथील कार्यक्रमाला स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. थिवी येथे झालेल्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. नागरिकांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. सायंकाळी म्हापसा येथेही कार्यक्रम पार पडला. नंतर नास्नोळा पंचायतीत हा कार्यक्रम पार पडला.
कोमुनिदादींनी पाठिंबा द्यावा : मुख्यमंत्री
घरे अधिकृत करण्याला काही कोमुनिदादींनी विरोध केला. कितीही कायदेशीर लढाया लढल्या तरी सरकारला फरक पडणार नाही. काही लोकांनी कोमुनिदादींच्या सदस्यांना पैसे देऊन घरे बांधली आहेत. लोक दंडापोटी जी रक्कम भरणार आहेत, तीही संबंधित कोमुनिदादींना मिळणार आहे. कोमुनिदादींनी योजनेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नास्नोळा येथे केले. आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून योजना चांगली असल्याचे सांगितले.
मयेवासीयांचा बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटला
अर्ज वितरणाचा शुभारंभी कार्यक्रम मये मतदारसंघात झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार प्रेमेंद शेट, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष धाकू मडकईकर, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव उपस्थित होते. घराची दुरुस्ती आणि विभाजनाची प्रक्रिया सोपी आणि लवकर पूर्ण होईल. घर असूनही ते नावावर नाही, अशी बहुतेक मयेवासीयांची परिस्थिती होती. आता बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला मयेवासीयांचा हा प्रश्न सुटला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
अर्ज मिळाले असले तरी लोकांनी अर्ज सादर करण्यासाठी गर्दी करू नये. अर्ज सादर करण्याला सहा महिन्यांचा कालावधी आहे. आवश्यकता भासल्यास अधिकाऱ्यांनाही पंचायत क्षेत्रात पाठवण्याची सरकारची तयारी आहे.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री