मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत : अस्नोडा येथे ‘माझे घर’ योजनेच्या अर्जांचे वितरण
थिवी : मागील सरकारांनी लोकांना धमकावून घरे पाडण्याची भीती दाखवली आणि मते मिळवली. पण, भाजप सरकार लोकांना फसवत नाही. आम्ही 'माझे घर' योजनेद्वारे लोकांच्या मानेवरची भयाची टांगती तलवार दूर करून घरे कायदेशीर करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक गोवेकर शांतपणे आणि काळजी न करता आपल्या घरात झोप घेऊ शकेल, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अस्नोडा येथील कार्यक्रमात काढले.
या कार्यक्रमाला खासदार श्रीपाद नाईक, सदानंद तानावडे, आमदार नीळकंठ हळर्णकर, म्हापसा मामलेदार आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोमंतकीयांची घरे कायदेशीर करण्यासाठी भाजपने नवीन कायदे केले आहेत. जे लोक यावर राजकारण करत आहेत त्यांना बळी पडू नका. फक्त स्टॅम्प पेपरवर कोमुनिदादने लिहून दिलेली घरे कायदेशीर होणार नाहीत. १९७२ पूर्वीची घरे, २०१४ पूर्वीची घरे, भाटकार किंवा खासगी जागेतील घरे आणि कोमुनिदाद जागेतील घरे यासाठी वेगवेगळे अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील, ज्यामुळे प्रक्रिया सुलभ होईल. अर्जदारांनी हे अर्ज येत्या सहा महिन्यांत पूर्ण करायचे आहेत. घरे कायदेशीर करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत मंजूर करताना विरोधी आमदार सभागृहातून बाहेर गेले होते, यावरून त्यांना घरे कायदेशीर झालेली नको होती, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
योजनेचा लाभ घेण्यासाठी नेत्यांचे आवाहन
* थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनीही, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामुळेच ४० वर्षांपासून घरे बांधलेल्या लोकांना आता हक्काचे घर मिळणार असल्याचे सांगत, सर्वांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
* उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी या योजनेला खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा पाठिंबा असल्याचे सांगून, गोवेकरांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.