स्कूटर- रिक्षा यांच्यात अपघात
वाळपई : होंडा सत्तरी येथे अॅक्टिव्हा स्कूटर आणि रिक्षा यामध्ये झालेल्या भीषण अपघातात स्कूटरच्या मागे बसलेला नागराज बंदीरवार (१८, रा. होंडा-सत्तरी) याचा गोमेकॉ येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
वाळपई-होंडा मार्गावर अॅक्टिव्हा स्कूटर (क्र. जी. ए. ०४ के ६२९८) होंडाच्या दिशेने जात होती. तर, टाटा रिक्षा होंडावरून पिसुर्लेच्या दिशेने जात असताना होंडा-वाडा येथे वळण घेत होती. त्याचवेळी भरधाव वेगात येणाऱ्या स्कूटरने रिक्षाच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. या धडकेत स्कूटरवरील दोघेही जखमी झाले. त्यातील मागे बसलेला नागराज बंदीरवार हा गंभीर जखमी झाला, तर स्कूटर चालक साईनाथ गावडे (३०, रा. सोनशी-सत्तरी) हा किरकोळ जखमी झाला. दोघांनाही तातडीने साखळी आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तेथून प्राथमिक उपचार केल्यानंतर नागराज याला पुढील उपचारासाठी गोमेकॉ येथे पाठविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वाळपई पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गोमेकॉ येथे उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
अपघात शनिवारी सकाळी घडला. अपघातात दोषी स्कूटर चालक साईनाथ गावडे याच्यावर गुन्हा नोंद केला असून वाळपई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. वाळपई पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रथमेश गावस पुढील तपास करीत आहेत.