पेडणे : धारगळ येथील आयुष हॉस्पिटलच्या वॉशिंग मशीन युनिटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीत ४ वॉशिंग मशीन आणि इतर सामान मिळून १५ लाखांचे साहित्य जळून भस्मसात झाले. पेडणे अग्निशामक दलाने आग नियंत्रणात आणली.
धारगळ येथील केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या आयुष हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत असलेल्या प्लास्टिक सामानास आग लागल्याने डॉक्टर व कर्मचारी वर्गात घबराट पसरली. धुराचे प्रचंड लोट हॉस्पिटल आवारात सगळीकडे पसरल्याने कर्मचारी वर्गात एकच गोंधळ उडाला.
हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता कदम यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी अधिकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. ताबडतोब पेडणे अग्निशमन दलाला पाचारण करण्यास सांगितले. सर्व सुरक्षा रक्षकांना बोलावून आग लागलेल्या परिसरातील सर्व कर्मचारी व डॉक्टर यांना हॉस्पिटल बाहेर काढण्यास सांगितले.
अग्नीशमन दलाचे अधिकारी नामदेव पवार यांना सदरची घटना समजताच आपल्या जवानांसह घटनास्थळी धाव घेतली व आग विझविण्यात यश मिळवले. आग शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान लागली. वॉशिंग मशीन युनिटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीत ४ वॉशिंग मशीन आणि इतर सामान मिळून १५ लाखांचे साहित्य जळून भस्मसात झाले.