म्हापसा : वागातोर येथे आयोजित संगीत रजनी इव्हेंटची सोशल मीडियावर पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली ‘नॉईस ओपन एअर बीच’ क्लबचे विजय अरोरा यांच्याविरुद्ध हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वागातोर येथील सेंट अँथनी चर्चचे धर्मगुरू फा. मार्सेलिनो डिसोझा यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी भा.न्या.सं.च्या २९९ कलमान्वये हा गुन्हा नोंदवला आहे.
हा प्रकार गुरुवार, दि. ९ पूर्वी घडला आहे. नॉईस ओपन एअर बीच क्लबमध्ये संशयिताने आयोजित केलेल्या संगीत रजनी कार्यक्रमाचे पोस्टर क्लबचे अकाऊंट असलेल्या सोशल मीडियावर टाकले होते. शनिवार, ११ रोजी रात्री आणि रविवारी १२ रोजी सकाळच्या टेक्नो ध्वनीसोबत हालेलुजाह ही प्रार्थना असेल, असे सदर पोस्टरमध्ये नमूद करण्यात आले होते.
ख्रिश्चन समुदायाने हे पोस्टर सोशल मीडियावर पाहिल्यानंतर त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. ही बाब त्यांनी फिर्यादी धर्मगुरूंच्या कानी घातली. त्यानंतर गुरुवारी रात्री फिर्यादींनी हणजूण पोलिसांत लेखी तक्रार दिली असता पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली.