अपघातानंतर वाहनचालक फरार; बीएमडब्ल्यू चालकाविरुद्ध गुन्हा

कळंगुट येथे अपघात : जमावाचे दोन तास घटनास्थळी आंदोलन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th October, 12:10 am
अपघातानंतर वाहनचालक फरार; बीएमडब्ल्यू चालकाविरुद्ध गुन्हा

म्हापसा : टीटो कळंगुट येथे निष्काळजीपणे वाहन हाकून अपघातानंतर जखमींना उपचाराची व्यवस्था किंवा पोलिसांना माहिती न देता गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याप्रकरणी पोलिसांनी विजय सोनू बुरूड (रा. ठाणे, मुंबई) या बीएमडब्ल्यू कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघातानंतर स्थानिक जमावाने दोन तास घटनास्थळी आंदोलन केले.

अपघात गुरुवार, दि. ९ रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास टीटो कळंगुट येथील शांतादुर्गा मंदिराजवळ घडला होता. बागाहून कळंगुटच्या दिशेने जाणाऱ्या एमएच ०४ एमक्यू १११२ क्रमांकाच्या बीएमडब्ल्यू कारने जीए ०३ एई ७०३४ क्रमांकाची अॅक्टिव्हा आणि जीए ०३ बीए ८३७६ क्रमांकाची डिओ या दुचाकींना ठोकर दिली होती. अपघातात दुचाकीस्वार सिप्रियानो लोबो (५१) व रेजिनाल्डो मिरांडा (५१) हे जखमी झाले. लोबो यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून मिरांडा यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.

अपघातानंतर घटनास्थळी अपघातग्रस्तांचे कुटुंबीय आणि इतर लोक जमा झाल्याचे पाहून कार चालकाने घटनास्थळीच कार टाकून पळ काढला. त्यानंतर कारमध्ये असलेल्या दोघांना जमावाने गराडा घातला. घटनेची माहिती मिळताच रॉबर्ट जीपवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व कारमधील दोघांना ताब्यात घेतले. जखमींना उपचारार्थ आरोग्य केंद्रात दाखल केले.

पर्यटकांच्या गाडीमध्ये दारुच्या बाटल्या होत्या. तसेच चालक दारुच्या नशेत असल्याचा दावा करीत जमावाने संशयिताच्या गाडीसह पोलीस जीपला देखील गराडा घातला. जमावाला पांगवण्यासाठी पोलीस निरीक्षक परेश नाईक हे अतिरिक्त पोलिसांची कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

जमावाची समजूत काढून जखमींच्या कुटुंबियांना पोलीस स्थानकात बोलावले. पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यास जखमी दुचाकीस्वार व त्यांचे कुटुंबीय तयार नसल्याचे पाहून शेवटी पोलिसांनी हवालदार पांडुरंग सामंत यांच्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

वैद्यकीय चाचणीत संशयित चालक दारुच्या नशेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत चोपडेकर हे करीत आहेत.