आरोग्य केंद्राच्या लिफ्टमध्ये अडकले दोन डायलिसीस रुग्ण

अर्धातासानंतर सुटका : एकाची प्रकृती बिघडली, दुसरा पडला बेशुद्ध

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
10th October, 12:45 am
आरोग्य केंद्राच्या लिफ्टमध्ये अडकले दोन डायलिसीस रुग्ण

पैंगीण : सरकारी सामुदायिक आरोग्य केंद्र, काणकोण येथे लिफ्टच्या निकृष्ट देखभालीमुळे झालेल्या बिघाडामुळे दोन डायलिसिस रुग्ण जवळजवळ अर्धा तास लिफ्टमध्ये अडकून पडले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेने रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, आगोंदा-काणकोण येथील डायलिसिस रुग्ण गुरु बांदेकर व आणखी एक रुग्ण हे लिफ्टने जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली. दोघेही आत अडकले होते. जवळपास ३० मिनिटे ते मदतीसाठी ओरडत राहिले, दरवाजा ठोठावला, पण कोणतीही तत्काळ मदत मिळाली नाही.

नंतर सुरक्षा रक्षक घटनास्थळी पोहोचला, मात्र त्याच्याकडे लिफ्ट उघडण्याची चावी नव्हती. शेवटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून दोन्ही रुग्णांना बाहेर काढले. या घटनेदरम्यान एका रुग्णाची प्रकृती बिघडली आणि तो काही वेळासाठी बेशुद्ध झाला. घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कडक टीका करण्यात आली. तसेच या घटनेची त्वरित चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.